जळगाव : जिल्ह्यातील रावेर येथे बोरखेडा रस्त्यानजीकच्या शेतामधील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ही हत्या कोणी आणि कशासाठी केली, याची माहिती मिळू शकलेली नाही. अज्ञाताकडून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेने जिल्हा संपूर्ण हादरुन गेला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या  एका शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या मध्यप्रदेशातील मूळ गावी गेले आहे. मात्र, शेतातील घरात ही चार भावंडे एकटीच राहत होती. रात्रीच्या सुमारास या चारही भावंडांची कुर्‍हाडीने हत्या केल्याचे पुढे आले आहे. आज सकाळी शेतमालक शेतात आल्याने हा सगळा प्रकार उघड झाला.


मृतांमध्ये १२, ११, ८ आणि ३ या वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. यात १२ वर्षांची मोठी बहीण आणि तीन वर्षांची चिमुकलीचा समावेश आहे. तर एका भावाचे वय ११ आणि दुसऱ्या भावाचे वय अवघे ८ वर्ष आहे. या लहान मुलांची का हत्या करण्यात आली, याचे कारण उलगडलेले नाही. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. अल्पवयीन भावंडांच्या हत्येने रावेर शहरात सन्नाटा पसरला आहे.