आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेना शहराध्यक्षाच्या हत्येने खळबळ उडाली होती. शिवा वझरकर नावाच्या उबाठा गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूरच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी उबाठा गटाच्याच तीन कार्यकर्त्याना अटक केली आहे. शिवा वझरकरच्या हत्यनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवा वझरकरच्या समर्थकांनी या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूरच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी उबाठा गटाच्याच तीन कार्यकर्त्याना अटक करण्यात आली आहे. शिवा वझरकरची गुरुवारी संध्याकाळी चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर नामक मित्राच्या कार्यालयाजवळ शिवा वझरकरचा मृतदेह आढळला होता. मृतक वझरकर आणि तीन आरोपी यांच्यात काही दिवसापासून वैयक्तिक कारणावरून धुसफूस सुरु होती. त्यातून हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.


गुरुवारी संध्याकाळी शिवा वझरकर याला तिन्ही आरोपींनी भेटायला बोलावलं आणि त्याची हत्या केली. चाकूने पोटात सपासप वार करत आरोपींनी शिवाची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. त्यानतंर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, शिवा वझरकर समर्थकांनी हत्येनंतर याभागात उभ्या असलेल्या जेसीबी आणि हायवा यांची तोडफोड करून व्यक्त संताप केला.


पोलिसांनी हत्येनंतर पळून जाणाऱ्या स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर या उबाठा गटाच्या तीन कार्यकर्त्याना अटक केली. पोलिसांनी रात्रीच कारवाई करत तिघांना जेरबंद केलं. रामनगर पोलीस आता या हत्या प्रकरणातील दुवे उकलत आहेत.


पोलिसांनी काय सांगितले?


'काल रात्री साडेआठच्या दरम्यान शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली. शिवा वझरकर आणि कुमरे यांच्यात भांडण झालं होतं. हिमांशू कुमरे याने चाकूने भोकसून शिवा वझरकरची हत्या केली. त्यामध्ये इतर साथीदारांनी सहभाग घेतला,' अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी दिली.