Murlidhar Mohol On Supriya Sule : लोकसभा निवडणुकीनंतर आता देशात एनडीएने सरकार (NDA Govt) स्थापन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर 72 मंत्र्यांनी देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. यामध्ये पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा देखील समावेश आहे. मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला लगावला होता. पुण्याला मंत्रिपद मिळालंय याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॅान्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा, असा टोला सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) लगावला होता. त्यानंतर आता यावर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.


काय म्हणाले Murlidhar Mohol?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर जवळपास 40 वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं, असा खोचक टोला मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.


ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणं, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो, असा टोला देखील मुरलीधर मोहोळ यांनी लगावलाय.


उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही, असं खणखणीत प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळेंना दिलंय.


सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?


मी कोयता गँगने तोडफोड केल्याची बातमी पाहिली. पुण्यात पाणी तुंबतय. ससूनची बदनामी सुरु आहे. ड्रग्ज सुरु आहे. पुण्यासाठी पक्ष विरहीत फोरम स्थापन करा. पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. पुण्याला मंत्रीपद मिळालंय, त्याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.