पुणे : मुळा कालव्याची भिंत फुटल्यानंतर सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी झालंय. या पाण्याचा शेकडो कुटुंबांना फटका बसला आहे. या पाण्याचा प्रवाह एवढा होता की अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्यांचं संसारोपयोगी साहित्य वाहून गेलं. रस्त्यावरील गाड्याही यातून सुटलेल्या नाहीत. अचानक पाणी आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. काहींची संसारउपयोगी भांडीही वाहून गेलीत. अनेक झोपडपट्ट्यांमध्येही पाणी घुसले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



पुण्यातील मुळा कालवा फुटल्याने घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनं या पाण्यात अडकल्या आहेत. मुळा कालव्यातील लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. खबरदारीसाठी खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी थांबविण्यात आले आहे. दरम्यान, मुळा कालवा ज्याठिकाणी फुटला त्याठिकाणची अवस्था एकदम दयनिय आहे. याठिकाणी गळती लागली होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आजचा प्रसंग ओढविल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.



जनता वसाहतजवळील कालव्याची भिंत फुटल्याने सिंहगड रोड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दांडेकर पूल देखील पाण्याखाली गेला. कालवा फुटून पाण्याचा लोंढा सुटल्याने सिंहगड रोड परिसरातील घरांत पाणी घुसले. घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेकांना बेघर व्हावं लागलं आहे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महापालिकेनं तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. अचानक निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळं सिंहगड रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.