अहमदनगर : जिल्ह्यातील राजकारण पुरते ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपवासी झालेत त्यावेळी जिल्ह्यात विधानसभेच्या सर्वच्या सर्व १२ जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. मात्र, भाजपच्या पदरात केवळ तीनच जागा पडल्यात. त्यानंतर जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांना पक्षात घेऊन काहीही फायदा झालेला नाही, उलट फटका बसला, असा थेट आरोप भाजपच्या पराभूत उमेदवारांनी केला. त्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणारे आरोप आणि चौकशी मागणी विखे-पाटील यांची डोकेदुखी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुजय विखे यांनी माझी आई अजून काँग्रेसमध्ये आहे, असे विधान केल्याने अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भाजपला सुजय विखे यांनी इशारा दिल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे विखे भाजपवासी असले तरी विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले अपयश त्यांच्या सोयीच्या राजकारणामुळे आल्याचे बोलले जात आहे. यात जिल्हा परिषदेचे गणित असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे या जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा आहेत. त्या अजूनही काँग्रेसच्या सदस्य असल्याचे सांगत त्यांचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेतील असे सांगून काँग्रेसकडूनच त्यांना पुन्हा संधी मिळेल, असा विश्वास खासदार सुजय विखेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद वाचवण्यासाठी विखे नवी खेळी खेळत आहेत का, याबाबत चर्चा रंगलीय. ३१ डिसेंबरला नगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आहे.


अहमदनगर जिल्हा परिषदेत एकूण ७३ सदस्य आहेत. जि.प. सभागृहात पक्षीय बलाबलाचा विचार करता काँग्रेसची संख्या अधिक असून काँग्रेसचीच सत्ता आहे. काँग्रेस २३, राष्ट्रवादी १९, भाजप १४, शिवसेना ७, शेतकरी क्रांती सेने(गडाख प्रणित) ५ आणि अपक्ष ५ अशी आहे. राज्यात महाराष्ट्र विकासआघाडी झाली त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे भाजप सत्ता मिळविणे कठिण जाणार आहे. त्यामुळे सुजय विखे यांच्या विधानामुळे शालिनी विखे या भाजपकडून निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे.