मित्रांसोबत मजा करणं बेतलं जीवावार; तलावात बुडून पाच तरुणांचा मृत्यू
Nagpur News : नागपुरच्या या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. मित्राला वाचवायच्या नादात दुसऱ्या मित्रांचाही जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील मोहगाव झिल्पी तलावात बुडून पाच तरुणांचा मृत्यू झालाय. मित्रांसोबत मौजमजा करायला मोहंगाव झिल्पी तलावावर गेलेल्या सहा मित्रांपैकी पाच तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.स्थानिकांच्या मदतीने रात्रीच्या सुमारास हिंगणा पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची नोंद केली आहे.
ऋषिकेश पराळे ,राहुल मेश्राम ,वैभव वैद्य, शंतनू अमरकर आणि नितीन कुंभारे अशी मृत तरुणांची नावे असल्याचे समोर आले आहे. सर्वजण हे सर्व नागपुरातील रहिवासी आहेत. रविवारी सुट्टी असल्याने ऋषिकेश पराळे त्याचा घराशेजारी राहणाऱ्या तीन मित्रांसोबत हिंगणा तालुक्यातील मोहंगाव झिल्पी तलावावर गेले होते. त्यातील चार जण पाण्यात पोहण्यासाठी तलावात उतरले. सर्व खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागले. काठावर असलेले दोघे मदतीला गेले. मात्र त्यातील एक जण बुडाला. दरम्यान तिथे पोहचलेले त्यांचे मित्र डॉ प्राजक्त यानो मदतीला आरडाओरडा केला पण कुणीही त्यांना वाचवू शकले नाही. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षला मोबाईलवरुन माहिती दिली. हिंगणा पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ गावातील पट्टीचे पोहणारे रेखराम भोंडे, शंकर मोरे यांच्या मदतीने मृतदेह शोध मोहीम सुरू केली व रात्रीच्या सुमारास सर्व पाचही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर पाचही जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
कसा झाला मृत्यू?
ऋषिकेश, शंतनू, राहुल आणि त्याच्या मित्राला झिल्पी तलावाच्या निळ्याशार पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. चौघांनाही पोहणे येत नव्हते. मात्र, ऋषिकेशने बढाई मारली आणि चौघेही पाण्यात उतरले. सुरुवातील तलावाच्या काठावर त्यांनी आंघोळ केली. मात्र, ऋषिकेश खोल पाण्यात गेला. त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे गेले. चौघेही बुडायला लागले. त्यामुळे वैभव वैद्य हा त्यांना वाचवायला गेला. बुडणाऱ्या चौघांनी त्यालाही पाण्यात खेचले. त्यामुळे पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला.
दुचाकी घसरून टेम्पोवर आदळल्याने एकाचा मृत्यू
दुचाकी घसरून टेम्पोवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील डेल्टा कंपनीच्या समोर घडली. भीम हेमराज सिंग असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिंग हे दुचाकीवरून अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या डेल्टा कंपनीसमोरून जात असताना त्यांची दुचाकी घसरून समोरून भरधाव वेगाने येणारा मालवाहतूक टेम्पोवर आदळली. त्यात भीम हेमराज सिंग यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.