प्रॉपर्टीच्या वादातून विधवा महिला आणि दोन मुलींवर हल्ला
प्रॉपर्टीच्या वादातून विधवा महिला आणि तिच्या दोन मुलींवर हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना नागपुरात घडलीय. या हल्ल्यात घरातल्या संपूर्ण साहित्याची तोडफोड करण्यात आली. संबंधित कुटुंबीय सध्या प्रचंड दहशतीत आहे.
जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : प्रॉपर्टीच्या वादातून विधवा महिला आणि तिच्या दोन मुलींवर हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना नागपुरात घडलीय. या हल्ल्यात घरातल्या संपूर्ण साहित्याची तोडफोड करण्यात आली. संबंधित कुटुंबीय सध्या प्रचंड दहशतीत आहे.
सहा जणांकडून हल्ला
नागपूरच्या गजानन नगर इथे प्रभा नेताम रविवारी रात्री त्यांच्या दोन मुलींसोबत जेवत असताना अचानक घरात ५ ते ६ जण घुसले. काही कळायच्या आतच नेताम यांना धक्काबुक्की करण्यात आली. घर रिकामं करा नाहीतर भयंकर परिणाम होतील अशा धमक्याही देण्यात आल्या. पोलिसांना फोन करू नये यासाठी फोनही तोडण्यात आला. अखेर प्रभा आपल्या मुलींसह कशाबशा जीव वाचवून घराबाहेर पडल्या. प्रभा यांच्या मुलीची बारावीची परीक्षा सुरू आहे. अशातच या घटनेमुळे ती दडपणात असल्याचं प्रभा सांगतात.
घरातील साहित्याची तोडफोड
नेताम घरातून बाहेर गेल्यावर आरोपींनी घरातल्या सर्व साहित्याची तोडफोड केली. टीव्ही, फ्रीज, मोबाईल कपाट या साहित्याची नासधूस केली. प्रभा या त्यांच्या पतीच्या वडिलोपार्जीत घरात गेल्या २० वर्षांपासून राहतात. सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर घरावरून पतीच्या भावांसोबत त्यांचे वाद सुरू झाले. या वादातूनच पतीच्या भावांनी भाडोत्री गुंड पाठवल्याचा आरोप नेताम यांनी केलाय.
पोलिसात तक्रार
पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात दंगा, घरात घुसून मारहाण, शस्त्रानिशी मारहाणीचे गुन्हे दाखल कऱण्यात आलेत. मात्र या घटनेतून गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही हेच दिसून येतंय.