अमर काणे, झी मीडिया, नागपूर : क्राईम कॅपिटल ही नको असलेली ओळख मिळालेल्या नागपुरनं (Nagpur) गंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊ या शहरांनाही मागे टाकलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (National Crime Records Bureau) नव्या अहवालात हे दिसून आलं आहे. दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या गुन्ह्यात नागपूरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. यानिमित्ताने उपराजधानीतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याची उपराजधानी नागपूर गेल्या काही वर्षांमध्ये गंभीर गुन्ह्यांमुळं सतत चर्चेत  आहे. 2014 ते 2020 पर्यंत पासून राज्याचं गृहमंत्री नागपुरचे होते. मात्र शहरात  गुन्हेगारीला लगाम मात्र लागला नाही. नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरोच्या नव्या अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात नागपूर देशात टॉपवर आहे. 


नागपुरात 2020 मध्ये हत्येच्या 97 घटना घडल्या. नागपूर पेक्षा जास्त हत्या झालेल्या शहरांमध्ये दिल्ली, बंगळूरु, चेन्नई, मुंबई, सुरत शहरांचा समावेश आहे. मात्र, नागपूरच्या तुलनेत या सर्व शहरांची लोकसंख्या जास्त आहे. काही शहरांत तर ती दुप्पट किंवा तिप्पट आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या  2020 वर्षाच्या गुन्हे विषयक अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे नागपुरात हत्येच्या प्रकरणाचे दर 3.9 इतका असून हा देशात सर्वाधिक आहे. 


या अहवालानुसार 2020 मध्ये बिहारची राजधानी पाटणा मध्ये हत्येची 79 प्रकरणं नोंदवली गेली असून दर एक लाख लोकसंख्या प्रमाणे पाटण्यात हत्येचा दर 3.84 आहे. म्हणजे नागपुरनं हत्येच्या घटनांमध्ये पाटण्यालाही मागे टाकले आहे. गेल्यावर्षी यासंदर्भात नागपूरचं स्थान पाटण्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर होतं. 


लॉकडाऊनच्या काळात नागपुरात या हत्या झालेल्या आहे. अंडरवर्ल्डचं शहर मानल्या जाणाऱ्या मुंबईत हत्येचं हे प्रमाण अवघे 0.8 इतकं कमी आहे.  राज्याच्या राजधानीपेक्षा हत्येच्या घटनांमधील उपराजधानीचा 2020 मधील दर चिंताजनक आहे. 


विरोधकांनी याबद्दल महाविकास आघाडीला जबाबदार धरलं आहे. पोलिसांच्या कामामध्ये गेल्या दीड वर्षात वाढलेला राजकीय हस्तक्षेप यास कारणीभूत असल्याचा आरोप  भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे.


शहरातील थिल्लर गुंडावर पोलिसांचा वचक नसल्यानेच हत्येच्या घटना वाढत चालल्या आहेत, असा आरोप सामान्य नागपूरकर करत आहे.