अमर काणे, झी मीडिया, नागपूर : कोरोना संकटाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे जेवढे आहेत, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने रुग्णांना त्यांच्या अडचणीचा फायदा घेत लुबाडणारे सध्या दिसून येत आहेत. नागपुरात अशाच एका भोंदू बाबा विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. शुभम तायडे नावाचा हा भोंदू बाबा कोरोना दूर करण्याचा दावा करत लोकांना लुबाडत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्या अंगामध्ये चक्क नागराज अवतरतात अशी थाप मारून तो लोकांना मूर्ख बनवत होता. एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एकात्मता नगर मधील त्याच्या घरी कोरोनाची बाधा दूर करून घेण्यासाठी रोज अनेक लोक यायचे.


त्यांच्यासमोरच शुभम त्याच्या अंगात नागराज अवतरले आहेत, असा बनाव करायचा. तोंडातून सापाचा आवाज काढत जोरात जोरात नृत्य करायचा, जमिनीवर आदळआपट करायचा. त्यामाध्यमातून गरीब कोरोना बाधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांवर प्रभाव निर्माण करायचा...



पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे,शुभम अवघ्या 21 वर्षांचा असून त्याने गेले अनेक दिवसांपासून ही बनवाबनवी सुरू केली होती.


नाग नृत्य करून आणि एक विभूतीसारखी औषध खायला द्यायचा. त्याच्या मोबदल्यात तो रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम घ्यायचा...


धक्कादायक म्हणजे नागपुरात लॉकडाउन असतानाही एकात्मता नगरमधील शुभम तायडे यांच्या घरी भरणाऱ्या दरबारात रोज मोठ्या संख्येने लोकं यायचे. ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली त्याच्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली.


काल पोलिसांनी शुभम तायडेच्या घरी जाऊन आधी सर्व बाबी तपासल्या, आणि त्याच्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई केली आहे.


महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा कायदा, 2013 अन्वये शुभम तायडे ला नोटीस दिली असून लवकरच त्याला अटक होणार आहे.