नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांचं उत्तर
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेसने संपूर्ण देशात कोरोना पसरवला असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शन केली जात आहेत.
काँग्रेस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील हॉटेल रेडीसनजवळील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही, पंतप्रधान मोदी यांनी देशाची माफी मागीवी अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर जमले. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले असून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
नितिन गडकरी यांच्या निवासस्थानबाहेर काँग्रेस करत असलेलं आंदोलन खपवून घेणार नाही असं सांगत भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं आहे.
गडकरींच्या निवासस्थानबाहेर भाजपाचे कार्यकर्ते तर रस्त्याच्या पलीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते उभे आहेत. तर मध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे