अमर काणे, झी मीडिया, नागपूर : कापलेला पतंग पकडण्याच्या नादात 12 वर्षाचा रेल्वेला धडकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. एन्टा विनोद सोलंकी असे मृत बालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी एंटा पतंग पकडण्यासाठी रेल्वे मार्गावरून धावत होता. तेवढ्यात समोरून ट्रेन आली एन्टाला काही समजण्यापूर्वी रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. यात तो घटनास्थळीच गतप्राण झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संक्रातीचा सण जसजसा जवळ येतो तसे शहरात पतंगीच्या नादात होणाऱ्या दुर्घटनांमध्ये वाढ झालीय. पालकवर्ग मुलांना कितीही समजावत असले तरी पतंग उडविण्याच्या नादात ते सांगण्यावर दुर्लक्ष करीत असल्याने अशा घटना सातत्याने घडतात. 



शिवकृष्ण धाम झोपडपट्टीच्या मागील भागात मंगळावरी वॉक्स कुलर कंपनीजवळील उडाणपुलाखाली एन्टा सकाळपासून कापलेल्या पतंगी गोळा
करीत होता. दुपारी 12.15च्या वाजताच्या दरम्यान नागपूर-दिल्ली रेल्वे मार्गावर कापलेल्या पतंगीकडे एकटक नजर ठेवून सैरावैरा धावत होता. 


नेमके याचवेळी समोरून भरधाव वेगात रेल्वे आली. एन्टाला काही समजण्यापूर्वी रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. यात तो घटनास्थळीच गतप्राण झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे आजुबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एंटाच्या वडिलांचाही काही वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झालाय. तर आईही निघून गेलीय. त्यामुळं तो आजीसोबत रहात होता. याप्रकरणी कोराडी पोलीस अधिक तपास करताय.