सावधान! विदर्भात कोरोना पसरतोय पुन्हा एकदा हातपाय
एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असताना अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागपूर: राज्यात कोरोना कुठे कमी होत असल्याचं दिसतानाच आता विदर्भासाठी धोक्याची घंटा आहे. याचं कारण म्हणजे नागपुरात मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्ण संख्या वाढली आहे. नागपूरमध्ये काल कोरोनाचे 500 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असताना अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे वर्ध्यातल्या हिंगणघाट तालुक्यात सातेफळ मार्गावरील स्पंदन निवासी शाळेतील 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. एकंदर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे हिंगणघाट तालुका पुन्हा एकदा हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे.
यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील कॉलेजेस उघडण्याचा 15 फेब्रुवारीचा मुहूर्त टळला आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे महाविद्यालयं 2 आठवडे उशिराने म्हणजे मार्च महिन्यात उघडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
देशात कोरोनाचे 9 हजार 309 नव्या रुग्ण आढळलेत.. आतापर्यंत 1 कोटी 8 लाख 80 हजार 603 कोरोनाग्रस्तांची नोंद झालीय. देशात 24 तासांत 87 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
एकूण 1 लाख 55 हजार 926 जणांचा बळी गेलाय.. गेल्या 24 तासांत 15 हजार 858 जणांनी कोरोनावर मात केलीय.. देशभरात आतापर्यंत 1 कोटी 5 लाख 89 हजार 230 जणांनी कोरोनावर मात केलीय.. सध्या 1 लाख 35 हजार 926 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.