Nagpur Crime : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग्रामपंचायतीत निवडूण आलेल्या एका भाजपा पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. धाब्यावरील कर्मचाऱ्यांनी भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, या हत्येनंतर पळून जात असताना आरोपींच्या गाडीचाही अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरातील पांचगाव येथे राजू डेंगरे या भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 3 च्या सुमारास एका ढाब्यावर हत्येची घटना घडली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजू डेंगरे हे विजयी झाले होते. त्यानंतर आता त्यांच्या अज्ञातांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे राजू डेंगरे यांची त्यांच्याच ढाब्यावर हत्या करण्यात आली आहे. राजू डेंगरे यांच्या मालकीचाच धाबा आहे. रात्री तीनच्या सुमारास धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.पोलिसांनी आता त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. डेंगरे यांच्या हत्येनंतर आरोपींनी गल्ल्यातील पैसेही पळवले आणि गाडी घेऊन फरार झाले. मात्र पुढे आरोपींच्या गाडीचा अपघात झाला. सध्या आरोपींचा शोध सुरू आहे.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजू डेंगरे यांचा विजय झाला होता. डेंगरे हे भाजपा नागपूर ग्रामीणचे महामंत्री होते. राजू डेंगरे यांच्या हत्येप्रकरणी कुही पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डेंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. दुसरीकडे डेंगरे यांच्या हत्येची माहिती मिळताच भाजपा कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.


भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या हत्येचा तपास करत कारवाई करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस अधिक्षकांना कडक कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली. हत्या कुठल्या कारणाने झाली याचा तपास करावा असेही बावनकुळे म्हणाले.