अमर काणे, झी 24 तास, नागपूर: पत्नी आणि मुलांसाठी काहीही करायला घराचा कर्ता सज्ज असतो. पण कोणता पती बायकोसोबत स्वत:च्या मुलाचे आयुष्य संपवत असेल तर? नागपूरमध्ये ही घटना घडलीय. हे करुन त्याने स्वत:च्या आयुष्याचाही शेवट केलाय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नी आणि स्वतःच्या अडीच वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वानाडोंगरी येथील संगम मार्गावर गजानन कॉलनीत असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. 


सचिन विनोद राऊत असे हत्या करणाऱ्या ड्रायव्हरचे नाव आहे. नाजनीन असे त्याच्या पत्नीचे तर युग असे त्याच्या अडीच वर्षाच्या मुलाचे नाव होते. सचिनने या दोन्ही मायलेकांची हत्या केली.


सचिन हा नाजनींन आणि युग सोबत शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास वानाडोंगरी येथील ओयो हॉटेल मध्ये आला होता.त्याने 4-5 तासाकरीता पहिल्या मजल्यावरील रूम न 103 भाड्याने घेतली होती. संध्याकाळपर्यंत कोणाला काहीच समजले नाही. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास प्रकार उलगडू लागला. ओयो हॉटेलच्या बाजूला असलेल्या रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला आतील धक्कादायक प्रकार दिसला. हॉटेलच्या पहिल्या माळ्यावरील खोलीत एक व्यक्ती गळफास लावून लटकलेली त्याला खिडकीतून दिसले.


याची माहिती त्याने मोबाईलद्वारे एमआयडीसी पोलिसांना दिली.पोलिसांनी रूम उघडली असता सचिन फासावर लटकलेला तर नाजनीन बेडच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या डोक्यावर हातोडीने वार केले होते. तर युग बेडवर पडून होता. त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडला होता. तिघेही मृत झाले होते.


अगोदर सचिनने नाजनींनच्या डोक्यावर वार करून तिला ठार केले. त्यानंतर युगला विष देऊन ठार केले. हे सर्व झाल्यावर त्याने स्वतः आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


मृतक नाजनीन ही सचिन ची दुसरी पत्नी होती. काही महिन्यांपासून नाजनीनं आणखी एका व्यक्तीच्या संपर्कात आली होती असा त्याला संशय होता. यावरून त्यांच्यात काहीतरी वाद झाला असावा आणि हे हत्याकांड घडले असावे अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.