Nagpur Crime : अशफाकचा झाला संजय, ऑनलाईन पैसे देतो सांगून सोन्याचे कडे घेऊन काढला पळ
Nagpur Crime News : आरोपीने कुरिअर बॉयला बोलवून ऑनलाईन पैसे देतो असे सांगून सोन्याचे कडे असलेले पार्सल घेऊन पळ काढला.
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : आतापर्यंत आपण ऑनलाईन वेबसाईटवरुन (online delivery) मागलेल्या वस्तूंमध्ये फसवणूक झाल्याचे अनेकदा ऐकले असेल. नागपुरात मात्र याउलट प्रकार घडलाय. एका व्यक्तीने चक्क डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या तरुणालाच गंडवले आहे. नागपुरात आरोपीने (Nagpur Crime News) खोट्या नावानं सोन्याचं कडे (gold bangle) मागवून पैसे न देताच पार्सल घेऊन पळ काढला आहे. आरोपीला सीताबर्डी पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
अशफाक अनवर असं आरोपीचं नाव असल्याचे समोर आले असून तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपीने खोट्या नावानं ऑनलाइन 1 लाख 87 हजार रुपयाचं सोन्याचं कडे कॅश ऑन डिलिव्हरीवर मागवले होते. पण कुरियर बॉयला पैसे न देता ऑनलाइन पैसे देतो असे सांगत आरोपीने पार्सल हिसकावून पळ काढला. सीताबर्डी पोलिसांनी वर्णनाहून अनवरला अखेर अटक केली. यावेळी त्याने सोन्याचं कडे 1 लाख 30 हजारात विकल्याचेही समोर आले आहे. याच पैशाने अशफाक ऑनलाईन रमी आणि तिनपत्ती खेळला आणि सर्व पैसे जुगारात हारला.
आरोपीने एका ऑनलाईक कंपनीकडून सोने आणि हिऱ्याचा वापर केलेल एक कडे मागवले होते. त्याची किंमत 1 लाख 88 हजार होती. आरोपीने सोन्याच्या कड्याची ऑनलाईन ऑर्डर देऊन कॅश ऑन डिलिव्हरी असा पर्याय निवडला होता. त्यानंतर डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या तरुणाने आरोपीला फोन केला तेव्हा त्याने आपले नाव संजय टेंभुर्णे असे सांगितले. फ्रिडम पार्कवरील सर्व्हिस रोडवर आरोपीने कडे देण्यासाठी बोलवले होते. यानंतर आरोपी डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला भेटला आणि आपली ओळख संजय टेंभुर्णे अशी करुन दिली. त्यावेळी आरोपीने मी ऑनलाईन पैसे भरतो असे सांगितले. मात्र डिलिव्हरीसाठी आलेल्या तरुणाने तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगितले. तितक्यात आरोपीने पार्सल घेऊन पळ काढला. कुरियर बॉयच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
"चौकशीनंतर आरोपीचे वर्णन केले असता आरोपी अशफाक खान हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. अशफाकला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला आहे. योग्य बिल असल्याने आरोपीने तो कडा विकून मिळालेल्या पैशातून ऑनलाईन रम्मी आणि तीन पत्ती खेळला. यामध्ये आरोपीने सर्व पैसे गमावले," अशी माहिती सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली.