Nagpur Crime : नागपुरात (Nagpur News) गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी (Crime News) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईनंतर या घटना थांबताना दिसत नाहीयेत. नागरिकांकडून यावर कारवाई करण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. मात्र गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशातच नागपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी एका रिक्षाचालकाची झोपेतच हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
 
नागपूर शहरातील कपड्यांची बाजारपेठ असलेल्या वर्दळीच्या सीताबर्डी परिसरातील हनुमान गल्लीत एका ऑटो चालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. पहाटेच्या सुमारासची ही घटना घडल्याचे तपासातून समोर आले आहे. हनुमान गल्लीतील गुजरात हॉटेल समोरील एका दुकानाच्या पायरीवर रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला आहे. झोपलेल्या अवस्थेत रिक्षाचालकाचा मृतदेह दुकानाच्या पायरीवर सापडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अज्ञात आरोपीने डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे. राजकुमार यादव (50) असे मृत रिक्षा चालकाचे नाव असल्याचे समोर आले आहे. राजकुमार यांच्या हत्येनंतर आरोपीने दगडही तिथेच ठेवला होता. मात्र हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरु केला आहे. मृत राजकुमार यादव हे रात्रपाळीत रिक्षा चालवत होते अशी माहिती समोर आली आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"प्राथमिक तपासानुसार पहाटे सकाळी पाच वाजता ही घटना घडली. ऑटो रिक्षाचालक रामकुमार यादव झोपलेला असताना त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून हत्या करण्यात आली आहे. आरोपीबाबत काही प्रमाणात माहिती मिळालेली आहे. आरोपीला तात्काळ अटक करुन पुढील तपास करु. व्हिडीओ फुटेज पाहिलं असता चोरीच्या उद्देषाने हत्या झाल्याचे दिसून येत नाही. मात्र हत्येचे कारण आरोपीला अटक केल्यानंतरच समजेल," अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.


भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू


वादळी वाऱ्यासह पावसाला नागपूर शहराला जोरदार तडाखा दिला आहे. नागपुरात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या दोन जणांचा बळी घेतला आहे. पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला आहे. भितींच्या ढिगाराखाली दबून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


200 रुपयांसाठी तरुणाची निर्घृण हत्या


उधारीचे पैसे न दिल्याने कोल्हापुरात एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अवघ्या तासात पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. गणेश नामदेव संकपाळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. हा खून केवळ दोनशे रुपयांच्या पानटपरीच्या उधारीवरून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.