Nagpur Crime : लग्नाचे आमिष देत शारिरीक संबंध ठेवले अन्... 23 वर्षाच्या तरुणाचा प्रताप
Nagpur Crime : या सर्व प्रकारानंतर आभासी जगात मैत्री करा पण सांभाळून पावले उचलायला हवीत असे स्पष्ट होत आहे. इंन्स्टाग्रामवर ओळखीनंतर आरोपीशी झालेल्या प्रेमप्रकरणातून महिलेला मनस्ताप सहन करावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : महिलेने लग्नाची मागणी करताच इन्स्टाग्रामवर (Instagram) बदनामी करणाऱ्या प्रियकराला मानकापूर पोलिसांनी (Nagpur Crime) अटक केली. त्यामुळे आता या आभासी जगात मैत्री करताना काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपीने सुरुवातीला महिलेसोबत फेसबुकवरून मैत्री केली होती. त्यानंतर दोघांची भेट झाली आणि ते आणखी जवळ आले होते. त्यानंतर आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. विरोध केल्यानंतर आरोपीने महिलेची बदनामी करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांत (Nagpur Police) तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद इरशाद फारूक अंसारी (23 ) असं आरोपीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. फारुकची 30 वर्षीय महिलेसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यानंतर फारुकने प्रेम आणि लग्नाचं आमिष देत तिच्यावर अत्याचार केला. पण जेव्हा महिलेने लग्नासाठी विचारणा केली तेव्हा फारुकने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. महिलेने पोलिसांत जाण्याची धमकी देताच आरोपीने महिलेचे न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर टाकले. यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी फारुकला पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पतीचे दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध असल्यामुळे पीडित महिलेने प्रेमसंबंध ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या महिलेची ओळख फारुकसोबत झाली. फारुकने मदत करण्याच्या बहाण्याने लग्नाचे आमिष दाखवले आणि महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले. यावेळी फारुकने महिलेचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ काढले होते. यानंतर फारुकने हे फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यानंतर महिलेने विवाहाबद्दल फारुककडे वारंवार विचारणा केली होती. मात्र त्याने नेहमीच टोलवाटोलवीची उत्तरे दिली. यानंतर महिलेने कडक शब्दात फारुकडे विचारणा केली आणि पोलिसांत देण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपी फारुकने महिलेचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. या सर्व प्रकारानंतर पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी फारूकला अटक केली आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
"2020 सोशल मीडियावरुन मुलाने मुलीला रिक्वेस्ट पाठवली होती. मुलीने रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केल्यानंतर दोघांमध्ये फेसबुकवर चॅटिंग सुरु झाले. 2021 मध्ये दोघांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्यात शारिरीक संबंध आले. मुलीचे दुसरीकडे संबंध असल्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर तरुणाने इन्स्टाग्रामवरुन मुलीची बदनामी करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून मुलगी पोलीस ठाण्यात आली होती. तक्रार नोंदवल्यानंतर मुलाला अटक करण्यात आली असून आरोपीला 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे," अशी माहिती मानकापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी दिली.
आभासी जगात मैत्री करा पण सांभाळून...
दुसरीकडे, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणींची ओळख होते. हळूहळू प्रेम होते. लग्नाच्या आणा भाका घेत मर्यादा ओलांडतात. पण हेच निर्णय कधी एखाद्याच्या जीवनात योग्य ठरला असला तरी बहुतांश प्रकरणात आयुष्य उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या आभासी जगातून होणाऱ्या संबंधांना आयुष्याचा शेवटापर्यंत नेण्याच्या निर्णय घेण्यापूर्वी काळजी घ्या आणि मगच पुढे जा. अन्यथा फसगत होऊन आयुष्य वेगळ्या वळणावर जयायल वेळ लागणार नाही असे आवाहन पोलीस करतायत.