पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : ऑनलाइन गेमिंगचे (Online Game) अ‍ॅप तयार करून उद्योगपतीची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात (Gondia Crime) समोर आला आहे. पोलिसांनी (Nagpur Police) याप्रकरणी पोलिसांनी जवळपास 10 कोटींची रक्कम ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातूनच ही रक्कम जप्त केली आहे. अनंत उर्फ सोमटू जैन असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचे फिर्यादीशी मैत्रीपूर्ण संबंध होते. मागील दोन वर्षांपासून या गेमच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने फसवणूक करत आरोपीने तब्बल 58 कोटी रुपयांचा फिर्यादीला गंडा घातला. नागपूर पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच तपास सुरु करण्यात आला. आरोपी हा गोंदियाचा असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता मोठी रक्कम सापडली आहे. आरोपीच्या घरातून पोलिसांना कोट्यावधी रुपये मिळून आले. सध्या पैशाची मोजमाप सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः दहा कोटी रुपयांची मोजणी झाली आहे. तसेच चार किलोचे सोनंही घरात मिळाल्याची माहिती समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी झाली फसवणूक?


आरोपीने तयार केलेल्या ऑनलाइन गेमिंगच्या अ‍ॅपमध्ये तीनपत्ती, कसिनो यासारखे विविध गेम होते. लिंकच्या माध्यमातून गेम लॉगिन आयडी देऊन हे अ‍ॅप शेअर केले जात होते. तसेच गेम खेळण्यासाठी पैसे दिल्यावर कॉइन स्वरूपात रक्कम ही त्या ॲपमध्ये जमा होत होती. अ‍ॅप सुरु झाल्यानंतर त्यावरुन विविध गेमद्वारे जुगार खेळला जायचा. मात्र हा जुगार खेळताना जर कोणी जिंकत असेल तर अ‍ॅपमध्ये अचानक एरर येत होता. या अ‍ॅपवरुन खेळणाऱ्या फिर्यादीने आपण गेम जिंकू असे म्हणत म्हणत त्यामध्ये कोट्यवधी रुपये लावले. मात्र नेहमीच अशाच प्रकारचा एरर येत राहिला. शेवटी फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.


हताश होऊन फिर्यादीने तक्रार करण्यासाठी थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपली फिर्याद नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केले. तपासामध्ये अ‍ॅपचे सर्व्हर हे देशाबाहेर सुद्धा असल्याची शंका असल्यानं पोलिसांनी कसून शोध सुरु केला आहे. दरम्यान यातील मुख्य आरोपी देशाबाहेर पळून गेल्याची शंका आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"ऑनलाइन गेमिंग ऍपच्याच्या माध्यमातून नागपूरातील उद्योगपतीची 58 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपीने ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कामावण्याचे आमिष फिर्यादीला दिले होते. फिर्यादीला अ‍ॅपमधील कसिनो, रमी, तीनपत्ती, क्रिकेट अशा प्रकारच्या गेमचे व्यसन लागले होते. 'डॉक्टर्ड' असे या अ‍ॅपचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र गेम जिंकत असतानाच त्यामध्ये एरर यायचा आणि त्याद्वारे फसवणूक व्हायची. आरोपीच्या घरातून 10 कोटी पेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपीच्या घरातून पैसे मोजण्याची कारवाई सुरूच आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे लोक पुढे आल्यास तपासात मदत होईल," अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.