सट्टा खेळण्यासाठी पैसे हवे होते, त्याने मॅट्रीमोनी साईटवर प्रोफाईल तयार केला आणि...
विवाहासाठी ऑनलाईन साईटवरून स्थळ शोधत असाल तर सावध राहा..!
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : इंटरनेटच्या (Internet) युगात सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. अगदी लग्नही ऑनलाईन जुळवली जातात. पण यात मोठ्याप्रमाणावर फसवणूकीचे प्रकारही समोर येत आहेत. नागपूरात सीताबर्डी पोलिसांनी (Nagpur Police) अश्याच पद्धतीने फसवणूक करणाऱ्याला एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिासांनी 41 वर्षांच्या भिकन माळी या आरोपीला अटक केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेला 41 वर्षीय भीकन माळी हा विवाहित आहे. त्याला पत्नी आणि मुलंही आहे. पण त्याला सट्टा लावण्याचं व्यसन असल्याने तो कुटुंबासोबत न राहता गेल्या तीन वर्षांपासून मुंबईतच रहातो. कधी रेल्वेत तर कधी रस्त्यावर छोट्या छोट्या वस्तू विक्रीचं काम तो करतो. पण सट्टा खेळण्यासाठी त्याला पैश्याची अडचण असल्याने त्याने एक शक्कल लढवली. ऑनलाईन विवाह जुळवणाऱ्या (Matrimony Sites) एका वेबसाईटवर त्याने प्रोफाइल तयार केली. या वेबसाईटवरील मुलींना तो रिक्वेस्ट पाठवत असे.
अनाथ मुलांच्या नावाने मागितले पैसे
ऑनलाईन साईटवर आरोपी भिकन माळी याची एका तरुणीसोबत ओळख झाली. तिला त्याने आपण अभियंता असून वडिल सेवानिवृत्त पोलीस असल्याचं सांगत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जून महिन्यात नागपूरमध्ये जाऊन त्याने मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुलीच्या कुटुंबियांना भिकन माळी पसंत पडला. आपण अनाथ मुलांसाठी काम करत असल्याचं सांगत त्याने मुलीच्या कुटुंबियांकडून 20 हजार रुपये घेतले आणि लवकरच लग्न करण्याचं आश्वासन देत मुंबईला परतला.
फसवणूक झालेल्या तरुणीने शिकवला धडा
मुंबईला आल्यानंतर त्याने आपला मोबाईल नंबर बंद करुन टाकला. अनेक दिवस संपर्क न झाल्याने आपण फसवलं गेल्याचं मुलगी आणि तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं. मुलीच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचं ठरवलं. नागपूरातील ज्या ट्रॅव्हल्स एजंटकडून त्याने मुंबईला जाण्यासाठी तिकिट काढलं होतं, त्या ट्रॅव्हल्स एजंटच्या मदतीने त्यांनी आरोपी भिकन माळीला शोधून काढलं आणि चांगलाच चोप दिला. यानंतर त्याला सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधिन केलं.
सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
भिकन माळी हा 41 वर्षाचा विवाहित असून सुद्धा तो विवाह न झालेल्या 35 किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलींच्या प्रोफाईल शोधून त्यांना रिक्वेस्ट पाठवत होता. त्यानंतर त्यांना आपल्याला सामाजिक कामात रस असल्याचे सांगत असतं. अशाप्रकारे दहा ते बारा मुलींना त्याने फसवल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विवाह इच्छुक मुलींनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, त्या व्यतिबद्दल संपूर्ण खात्री करून घ्यावी असं आवाहन सीताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी केलं आहे.