`तुमच्या मुलानं बलात्कार केलाय`, सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!
Cyber Fraud Extortion in Nagpur : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय.
Nagpur Crime News : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक (Cyber Fraud Extortion) करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय. ''तुमच्या मुलाने बलात्कार केलाय, सोडवायचे असल्यास दहा लाख रुपये द्यावे लागतील..'' असे फोन सध्या राज्यातील अनेक शहरातील तरुण मुलांच्या पालकांना सायबर भामट्यांकडून येतायत. त्यामुळे अनेकांना लाखोंचा गंडा देखील बसलाय. त्यामुळे नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) कठोर पाऊल उचललं असून असा गुन्ह्यांना बळी पडू नका, असं आवाहन केलंय.
''मुलगा बलात्काराच्या प्रकरणात अडकला आहे... त्यानं मित्रांसह मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलाय. आम्ही पोलीस असून तुमच्या मुलाला त्याच्या मित्रांसह अटक केली आहे. तुमच्या मुलाला या प्रकरणातून सोडवायचे असल्यास दहा लाख रुपये द्यावे लागेल. त्यासाठी बोलणी सुरू करण्यासाठी किमान 40 हजार रुपये ऑनलाईन पाठवा'', असं सायबर भामट्यांकडून सांगण्यात येतं. मात्र, अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नका, असं सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
नागपूरात अनेक पालकांना असे फोन येतायत. धक्कादायक बाब म्हणजे या सायबर गुन्हेगारांना फोन केलेल्या पालकाच्या मुलाचे नाव काय, वय काय, तो कुठे असतो याची इत्यंभूत माहिती असते. त्यामुळे अनेक पालक घाबरून या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून त्यांच्याशी पैशाची बोलणी करतात. तर काहींनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. अशाच एका जागरूक पालकानं झी 24 तास शी बोलून इतर पालकांची त्यात फसवणूक होऊ नये म्हणून स्वतः सोबत घडलेला सर्व प्रसंग सांगितला आहे.
पाहा Video
दरम्यान, सायबर भामटे पैसा उकळण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ लागलेत.. कदाचित भामट्यांचा पुढचा फोन तुमच्या फोनवरही येऊ शकतो.. तेव्हा सावध राहा,सतर्क राहा... फोन आल्यास तातडीन सायबर पोलिसांकडे तक्रार करा, असं आवाहन पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी केलंय.
दरम्यान, नवे पोलीस आयुक्त रुजू झाल्यापासून हत्याकांडाची मालिका आणि गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध अधिक प्रखरतेने रंगल्याचं पहायला मिळतंय. अनेक लहान गुन्हेगार वस्तीत वर्चस्व निर्माण करण्यासाठी टोळ्यांचा खटोटोप सुरू आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य लोकांना होताना दिसतोय. तर नागपूरात चाललंय तर काय? असा सवाल देखील विचारला जात आहे.