अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात (Nagpur Crime) तीन वेगवेगळ्या घटकांमध्ये चार जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील कोंढाळी येथे दोन व्यापाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दोघांचेही मृतदेह जाळून नदीत फेकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी (Nagpur Police) पाच जणांना अटक करण्यात आली. तर इतर दोन घटना शहरातील जरीपटका आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. चार जणांच्या हत्येमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन व्यापाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना जिल्यातील कोंढळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर दोघांचाही मृतदेह जाळून नदीत फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अंबरीश गोळे आणि निरालाकुमार सिंग अशी मयत व्यापारांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी पाच मारेकऱ्यांना अटक केली आहे. अंबरीश हे कंत्राटदार आहेत तर निराला सिंग यांचा कापड विक्रीचा व्यवसाय आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओंकार तलमले, लकी तुरकेल, हर्ष वर्मा ,दानिश शिवपेठ, बागडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 


अंबरीश गोळे आणि निराला कुमार सिंग यांची ओंकार याच्यासोबत ओळख होती. अंबरीश व निराला सिंग यांना ओंकारने दीड कोटी रुपयांचा डीडी दिल्यास दोन कोटी 80 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. याबाबत व्यवहार करण्याकरता सर्वेजण 25 जुलैला संध्याकाळी कोंढाळी येथील तुरकेलच्या फार्म हाऊसवर भेटले होते. मात्र अंबरीश आणि निराला यांनी डीडी दिल्यानंतर ओंकारने पैसे देण्यास टाळाटाळ केली. यावरुन फार्महाउसवरच वाद सुरू झाला. यातूनच ओंकारने पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून दोघांची हत्या केली. नंतर अंबरीश आणि निराला सिंग यांचे मृतदेह ओंकारने सहकाऱ्यांच्या मदतीने जाळले आणि तळेगाव जवळील वर्धा नदीत नेऊन फेकले.


दरम्यान दोन्ही व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांनी ते घरी न परतल्याने शहरातील सोनेगाव व सीताबर्डी पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास केला असता दोघांसोबत आरोपी लकी आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी सगळी सूत्रे हलवली आणि कसून तपास केल्यावर हे हत्याकांड उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करत त्यांना कोंढाळी पोलिसात स्वाधीन केले आहे.


जरीपटका आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या


जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलाने शिवीगाळ करणाऱ्या शेखर नामक व्यक्तीचा तलवारीचे वार करून खून केला आहे. याप्रकरणी मुलाच्या आईनेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तर दुसऱ्या घटनेत नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंथरुणाला खिळलेल्या गतिमंद बहिणीशी भावाचा वाद झाल्याने हत्याकांड घडलं आहे. बहिणीसोबत झालेल्या वादातून भावाने तिला मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतले आहे.