Crime News : मोबाईल (Smartphone) घेण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातून (Nagpur Police) समोर आला आहे. नागपूरमध्ये एका 28 वर्षीय तरुणाने आपल्या आईला स्मार्टफोन घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तिचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी (Nagpur Police) आरोपी मुलाला अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. शवविच्छेदनातून गळा दाबून हा खून करण्यात आल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमलाबाई बडवाईक असे मृत महिलेचे नाव असून त्या 47 वर्षांच्या होत्या. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण गळा दाबण्यात आले आहे. याप्रकरणी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी पोलीस पथकाने तपास सुरू केला आहे. व्यसनी आणि बेरोजगार मुलाने दारुसाठी मोबाइल विकण्याच्या वादातून जन्मदात्रीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास हुडरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजानन महाराजनगर परिसरात घडली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मृत महिलेचा दुसरा मुलगा दीपक याने सांगितले की, त्याला फोन आला की त्याचा भाऊ त्याच्या आईला रामनाथ रुग्णालयात घेऊन गेला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला. जेव्हा त्याने त्याच्या आईचा मृतदेह पाहिला तेव्हा त्याला काहीतरी चुकीचे वाटले. आईचे सोन्याचे दागिनेही गायब होते. त्यामुळे दीपकला याबाबत काही शंका होत्या. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दीपकचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संशयाच्या आधारे रामनाथची चौकशी करण्यात आली. चौकशीत आईचा स्कार्फने गळा आवळून खून केल्याची कबुली रामनाथने दिली. स्मार्टफोनसाठी पैसे न दिल्याने हे पाऊल उचलल्याचे रामनाथने सांगितले.


रामनाथने आईला मारहाण केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे दीपकला रामनाथवर संशय आला होता. त्याने तात्काळ हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून रामनाथ विरोधात तक्रार दिली. दीपकच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी रामनाथला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रामनाथला अटक केली आहे.