Nagpur Crime : बाईकला धडक बसल्याने रागाच्या भरात तरुणाची हत्या; गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात सलग तिसरी गंभीर घटना
Nagpur Crime : पुण्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून नागपुरातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच नवीन वर्षातही गुन्हेगारीच्या वारंवार घटना दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तीन हत्या झाल्याने नागपुरकर दहशतीच्या छायेखाली आहेत.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : रागाच्या भरात कोणी काय करेल याचा नेम नाही. शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. असाच काहीसा प्रकार नागपुरातून (Nagpur News) समोर आला आहे. एका तरुणाला दुचाकीला धडक बसल्याचा राग इतका अनावर झाला की यामध्ये एकाला जीव गमवावा लागला. दुचाकीला धडक बसल्याच्या शुल्लक कारणावरुन दोघांमधील वादात एका तरुणाची हत्या (Crime News) झाली.
नागपूर शहरातील कळमना परिसरातील गुलमोहर नगर येथे रविवारी रात्री हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अजय उर्फ लक्ष्मीनारायण चंदानिया असे या वादात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अजयचा विनय साहू नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला आणि त्याला जीव गमवावा लागला. या वादात अजयचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे.
वाढदिवसाला भाच्यासाठी गिफ्ट घ्यायला गेला आणि...
अजय चंदनिया हा कामठी येथील संत रोहिदास नगरचा रहिवासी आहे. तर आरोपी विनय साहू हा हमालीचे काम करतो. विनय रविवारी रात्री भाच्याचा वाढदिवसाकरता खरेदी करण्यासाठी दुकानात जात होता. यावेळी अजयच्या दुचाकीसोबत त्याची धडक झाली. दुचाकीची धडक बसल्यामुळे अजय आणि विनयमध्ये वाद सुरु झाला. अजयने विनय साहूकडे भरपाईची मागणी केली. यावरुन दोघांमधील वाद वाढला. हा वाद दोघांच्या हाणामारीपर्यंत पोहचला. याच्यातूनच संतापाच्या भरात विनयने अजयवर चाकूने वार केला. यावेळी अजयसोबत असलेला त्याचा मित्र शाम देवांगही या हल्ल्यात जखमी झाला.
नवीन वर्षातच हत्येची तिसरी घटना
या हल्ल्यानंतर दोघांनाही उपचाराकरता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अजयला मृत घोषित केले. याप्रकरणी कळमना पोलिसांनी आरोपी विनय साहूला ताब्यात घेतले आहे. नवीन वर्षातील नागपूर शहरातील हत्येची ही तिसरी घटना आहे. वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच पाच पावली आणि सक्करदरा पोलीस स्टेशन अंतर्गत हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातच या घटना सातत्याने होत असल्याने लोकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, अगदी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून हत्येच्या घटनेमुळे सर्वजण सुन्न झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पार्किंगवरुन, गाडीला कट लागला म्हणून होणाऱ्या वादाचे पर्यावसन गंभीर गुन्ह्यांमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना अनेक सवाल उपस्थित करत आहे.