पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : आई बहणीला शिव्या दिल्या म्हणून चक्क नागपूर रेल्वेस्टेशच्या (Nagpur Crime) क्रमांक चारच्या फलाटावर डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लोहमार्ग पोलिसांनी (Napur Police) दिनेश सदाफुले नामक आरोपीला अटक केलीय. तेच जितेंद्र असं मृतकाचे नाव असून तो छत्तीसगडचा असल्याची माहिती समोर आली आहे. या खळबळजनक घटनेमुळे नागपूर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृतक जितेंद्र आणि दिनेश हे दोघेही परिसरातील कॉटन मार्केटमध्ये मोलमजुरी करत होते. दिवसभर काम करून दोघेही रात्री रेल्वे फलाटावर येऊन झोपत असत. नेहमी प्रमाणे घटनेच्यावेळी दारू पित असतांना दोघाचा वाद झाला. त्यानंतर ते झोपी गेले पण दिनेशच्या मनात असलेल्या राग शांत झाला नव्हता. दिनेशने रागाच्या भरात झोपलेल्या जितेंद्रच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तो रेल्वे फलटावरच लपून बसला होता.


त्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलीस शिपायाला फलाट क्रमांक पाचवर पहाटे पावणे चारच्या सुमारास एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली. मृताच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये एक व्यक्ती जितेंद्रला असताना दिसून आले. पोलिसांनी आणखी तपास केला असता तो दिनेश असल्याचे समजले. पोलिसांनी फलाटावर शोधाशोध सुरु केली असता दिनेश लपून बसल्याचे त्यांना आढळले. लगेचच दिनेशला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 4 आणि 5 च्या शेवटी रेल्वे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर मार लागल्याचे दिसून आले आहे. कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत व्यक्तीला एक व्यक्ती जवळपास 23 किलो वजनाचा सिमेंटचा ब्लॉक डोक्यामध्ये टाकताना दिसून येत आहे. त्यानंतर जखमीला रुग्णालयात हालवण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पहाटे 3.45 च्या सुमारास आम्हाला हा सर्व प्रकार कळला. पण सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार रात्री 2.40 च्या सुमारास आरोपीने या व्यक्तीची हत्या केली आहे. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीने दिलेल्या जबाबानुसार रात्री दहाच्या सुमारास दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. मयत व्यक्तीने आरोपीला पुतणी, बहीण आणि आईच्या नावाने शिवी दिली. त्याचाच राग आरोपीला आला आणि त्याने मृताच्या डोक्यात दगड टाकला. त्यानंतर तो फलाटाच्या सुरुवातीला येऊन बसला होता. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मृत हा छत्तीसगड येथील असल्याची माहिती समोर आली आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी दिली.