अमर कामे, झी मीडिया, नागपूर : अगोदरच कोरोनातल्या आर्थिक संकटामुळे अनेक जण चिंतेत आहेत. अशातच सायबर गुन्हेगार नवनव्या युक्त्या शोधून लोकांची फसवणूक करत असल्याचा घटना वाढत आहेत. त्यामुळे लोकांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात एका सायबर गुन्हेगाराने अख्ख्या कुटुंबाचेच बॅक खातेच साफ केल्याच उघडकीस आलं आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेलही चक्रावून गेले आहे. नागपूरच्या वर्मा लेआऊट मध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील तरुण मुलाला फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी फोन केला.  कर्जावर घेतलेल्या तुझ्या लॅपटॉपचा  हफ्ता शिल्लक आहे. तो तातडीने भर, नाही तर भरमसाठ व्याज आकारला जाईल, असे सांगून भीती निर्माण केली... 


फोन आल्यानंतर हा तरुण घाबरला, त्यामुळे त्याने त्याच्या सेवानिवृत्त वडिलांच्या डेबिट कार्डचे डिटेल त्या भामट्याला दिले. एवढेच नाही सायबर  गुन्हेगारांनी भीती दाखवताच वडिलांच्या बँक खात्याशी जोडलेला त्यांचा कस्टमर इन्फर्मेशन नंबर (CIF ) सुद्धा सायबर गुन्हेगारांना दिला.


दुर्दैवाने या कुटुंबातील सर्व सदस्यांचे बँक खाते आपापसात जोडलेले होते. सायबर गुन्हेगारांनी वडिलांच्या बँक खात्यातून ५ लाख, तर आईच्या बँक खात्यातून २ लाख तसेच पीडित तरुण आणि त्याच्या भावाच्या बँक खात्यातून आणखी ५० हजार असे साडेसात लाख रुपये काही मिनिटातच लंपास केले.


पीडित कुटुंबाने नागपूर पोलिसांच्या सायबर सेल कडे तक्रार नोंदविली असून त्यासंदर्भात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ज्या पद्धतीने एका खात्यातील महत्वाची माहिती घेऊन सायबर गुन्हेगारांनी अख्ख्या कुटुंबाचे बँक खाते साफ केले आहे. ही या पद्धतीची पहिलीच घटना असल्याने पोलीस ही चक्रावून गेले आहेत. 


लोकांनी कुटुंबातील सदस्यांचे बँक खाते एकमेकांशी जोडलेले असले तरी त्याच्यातून रक्कम काढली जात असताना दोघांच्या संमतीशिवाय ती रक्कम काढली जाऊ नये, अशी सोय बँकेकडून घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या तपासात सायबर गुन्हेगार बिहार मधून बोलत असल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस गुन्हेगारांच्या मागावर आहेत.