अमर काणे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : नागपुरात पाणी समस्या भीषण होत चालली आहे. महापालिका येत्या दोन-तीन दिवसात पाणी कपातीबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे पाणीचोरीवर नियंत्रणासाठी उशीराने जाग आलेल्या महापालिकेनेकडून आता सेव्ह वॉटर हेल्पलाईन नंबरही सुरु करण्यात येणार आहे. सेव्ह वॉटर हेल्पलाईन नंबरवर पाण्याची नासाडी करणा-यांची तसेच पाणीचोरट्यांबाबत तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सही राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही दिवसांपासून नागपुरात घोंगावत असलेल्या पाणी समस्येनं आता गंभीररुप धारण केलं आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या जलाशयात १० जुनपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा असल्याने पाणीबचतीचं आवाहन महापालिकेनं केलं होतं. मात्र शहराची तहान भागवण्याकरता आता महापालिकेला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे.


पाण्याची नासाडी व गैरवापर करण्यासाठी महापालिकेनं सेव्ह वॉटर हेल्पलाईन नंबर जाहीर करणार आहे. 8888822700 या क्रमांकावर पाण्याचा गैरवापर वा चोरी करणा-यांबाबत तक्रार करण्याचं आवाहन महापालिकेने केले आहे. तक्रारदार नागरिकाचे नावही गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके यांनी सांगितलं.


एकीकडे अंगाची लाही-लाही करणार तापमान कमी होत नसताना दुसरीकडे  मान्सूनला विलंब होत आहे. त्यामुळे महापालिकेला पाणीकपातीशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यादृष्टीनेच पाण्यासंदर्भातील आढावा बैठक येत्या दोन दिवसात होणार असल्याचं झलके म्हणाले.


महापालिकेनं फार अगोदरच पाण्याचे नियोजन करण्याची गरज होती. मात्र महापालिकेला नेहमीप्रमाणे उशीरानं जाग आली आहे. त्यामुळे मान्सून अजून उशीरा पोहचल्यास नागपुरात पाणीबाणी निर्माण होवू शकते.