कोरोनामुळे नागपुरातील १३६ वर्षांची वैभवशाली परंपरा खंडित होणार
पिवळी मारबतच्या 136 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मारबत मिरवणूक निघणार नाही.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर: राज्याच्या उपराजधानीतील वैशिष्ट्य आणि वैभव असलेल्या मारबत-बडग्या मिरवणूकीस यंदा मनाई करण्यात आलीय. कोविडमुळं यंदा केवळ परंपरेनुसार मारबत दहन करण्यासाठी पाच जणांनाच कोविडचे नियम पालन करत परवानगी राहणार आहे. १३६ वर्षांची पिवळी मारबतच्या इतिहासात मिरवणूकीची परंपरा पहिल्यांदाच खंडीत होत आहे.
बाप्पा पावला, कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा
विदर्भाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या मारबतोत्सवातील काळ्या-पिवळ्या मारबतीचा भेटीचा हा क्षण यंदा तान्हा पोळ्याला अनुभवता येणार नाही. मारबत-बडग्या मिरवणूकीस यंदा मनाई करण्यात आलीय.कोविडमुळं उद्धभवलेल्या परिस्थितीमुळं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीनं मारबत मिरवणूकीस मनाई केलीय. परंपरेनुसार मारबत दहन करण्यासाठी मात्र पाच जणांना कोविडबाबतचे नियम पाळत परवानगी देण्यात आलीय. पिवळी मारबतच्या 136 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मारबत मिरवणूक निघणार नाही. पिवळी मारबत उत्सव समितीनंही कोविडबाबतचे सर्व नियमांचे पालन करणार असल्याचं स्पष्ट केले आहे.
कृष्णाच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुतणा मावशीचे प्रतीक जागनाथ बुधवारी येथून पिवळी मारबत आणि इंग्रजांना साथ देणाऱ्या बाकाबाईचे प्रतीक म्हणून नेहरू पुतळा येथून काळी मारबतची ही मिरवणूक निघते. समाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात तान्हा पोळ्याला ही मारबत-बडग्या मिरवणुक निघत असते. प्रतिकात्मक बडगे आणि त्यावर लिहलेले उपाहासात्मक संदेश मिरवणूकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. मात्र कोविडनं यंदा मारबत-बडग्या मिरवणूकीस मनाई तर आहेच शिवाय तान्हा पोळाही सार्वजनिक पद्धतीनं साजरा करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहेत.