Maharashtra Weather: वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस; विदर्भात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Rain Alert : नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Rain Alert: राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे. तापमानात प्रचंड वाढ होत आहे. तर, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यातच आता विदर्भात अवकाळीचा तडाखा बसणार आहे. वादळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे (Rain alert). नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात अमरावती,अकोला, यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम येथेही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर विभागात 16 मार्च उद्यापासून ते 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 16 व 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्हयात अति सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
गारपीट आणि वादळी पावसामुळे मनुष्य तसेच वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत गुरुवार 16 मार्च तसेच शुक्रवार 17 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच 16 ते 19 मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवार 17 मार्च रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. याकाळात वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. यासोबतच दुरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते असा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.