अमर काणे, झी मीडिया, नागपूर : बंद पडलेल्या कारमध्ये गुदमरुन झालेल्या तीन मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने नागपुरातील (Nagpur Crime) फारुक नगर परिसर हादरून गेला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाले होते. मात्र या तिन्ही बेपत्ता मुलांचे मृतदेह एका बंद पडलेल्या कारमध्ये सापडले आहेत. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यूने झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेळता खेळता ही तिन्ही मुले घरापासून थोड्या दूर असलेल्या बंद पडलेल्या कारमध्ये जाऊन बसली होती. मात्र कारचा दरवाजा लॉक झाल्याने त्यांचा आतमध्येच गुदमरून (suffocation) मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी (Nagpur Police) व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी दुपारी तिन्ही मुले टेका नाका येथील फारुख नगर मैदानात खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली होती. रात्री उशिरापर्यंत मुले घरी परत न परतल्याने कुटंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. मात्र बराच शोधाशोध करुनही मुले न सापडल्याने कुटुंबियांनी पाचपावली पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिन्ही मुले एकाच वेळी गायब झाल्याने पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ मुलांचा शोध सुरु केला. पोलिसांनी लगेच त्या भागातील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले. पण, मुलांचा छडा लागला नाही. बराच वेळ त्यांचा शोध लागत नव्हता.


मात्र शोधाशोध सुरु असताना रविवारी संध्याकाळी सात वाजता लोकांना एका कारमधून दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर ही कार उघडण्यात आल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिन्ही बेपत्ता झालेल्या चिमुकल्यांचे आढळले आहेत. पाचपावली पोलिसांना याप्रकरणाची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह मोठा अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुलांचा गुदमरून मृत्यू झाला असला तरी पोलिसांनी अपहरणाच्या कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"या मुलांचे मृतदेह फारुख नगर येथील मैदानात पार्क केलेल्या एका जुन्या कारमध्ये सापडले. ही मुलं त्या कारमध्ये खेळत होती. खेळता खेळता ही मुलं गाडीमध्ये लॉक झाली. त्यामुळे त्यांना बाहेर पडणं मुश्किल झालं. या मुलांचा गुदमरून आणि उष्णतेमुळे मृत्यू झाला," अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.



नेमकं काय घडलं?


फारूक नगर परिसरात ज्या फोर्ड इकोस्पोर्ट कार मध्ये तिन्ही मुलांचे मृतदेह आढळले ती कार पूर्णपणे भंगार आहे. तिन्ही मुलं कारमध्ये बसण्याच्या मोहात गाडीच्या आतमध्ये शिरली असावीत. मात्र नंतर दार लॉक झाले असावे आणि आतून दार उघडता येईल अशी यंत्रणाच नसल्यामुळे मुलं त्यात अडकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय ही कार त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून पासून उभी होती. त्यामुळे कारमध्ये साचलेली धूळ, आतील दमटपणा यामुळेही मुलांचा श्वास गुदमरला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.