कोण म्हणतं प्रामाणिकपणा हरवलाय? हातावर पोट असणाऱ्या वृद्धानं पावणेचार लाखांचं सोनं केलं परत
Nagpur News : नागपुरात सध्या या घटनेची जोरदार चर्चा असून पोलिसांकडूनही या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. वृद्ध व्यक्तीच्या एका कृतीने पावणेचार लाखांचं सोनं मूळ मालकाला परत मिळालं आहे.
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : पावणेचार लाखांचं सोनं (Gold) असलेली गहाळ झालेली पिशवी 70 वर्षीय कॅलेंडर विक्रेत्याने प्रामाणिकपणाने परत केल्यानं नागपुरात (Nagpur News) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कॅलेंडर विक्रेत्याने सोनं असलेली ही पिशवी मूळ मालकाला परत दिली आली. 73 वर्षीय अशोक खंडेलवाल हे सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी जात असताना टांगा स्टँड चौकात त्यांची पिशवी गहाळ झाली होती. सोनं ठेवलेली पिशवी कोणीतरी उचलून नेल्याचे समोर आले होते. यानंतर अशोक खंडेलवाल यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पिशवी घेऊन गेलेल्या व्यक्तीचा शोध घेतला आणि तात्काळ ती खंडेलवाल यांना परत केली.
पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये आढळून आले की एका व्यक्तीने ही पिशवी उचलून नेल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता ती वयोवृद्ध व्यक्ती कॅंलेडर विक्रेती असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसानी त्या वयोवृद्धाचा शोध घेतला असताना त्यांनी पिशवी सापडल्याचं कबुल केलं. पण त्यात काय आहे हे तपासून सुद्धा या कॅलेंडर विक्रत्याने पाहिले नव्हते. मात्र पोलिसांनी याची माहिती दिल्यानंतर त्यांनाही थोडा धक्का बसला. यानंतर पोलिसांनी ती पिशवी मूळ मालकाला परत दिली आहे. दुसरीकडे पोलिसांनी या कॅलेंडर विक्रेत्याचे कौतुक केले आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
"टांगा स्टॅंड या परिसरातील अशोक श्रीराम खंडेलवाल यांनी पोलीस ठाण्यात येऊन सांगितले की, लग्नासाठी सोन्याचे दागिने लॉकरमधून काढले होते. त्यानंतर ते पुन्हा ठेवण्यासाठी जात असताना सोने ठेवलेले पिशवी रस्त्यावर कुठे तरी पडली. त्यांची तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर आम्ही ताबडतोब पथकाला आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश दिले. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी एका कॅलेंडर विकणाऱ्या व्यक्तीने ही पिशवी उचलून नेल्याचे समोर आले. त्याबाबत इतरांकडे चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने त्या व्यक्तीचा पत्ता शोधून काढला आणि तपासणी केली असता सोने असलेली पिशवी आहे त्या परिस्थितीमध्ये असल्याचे दिसले. त्यांनी पिवशी तपासली असता त्यामध्ये 3 लाख 85 हजारांचा सोन्याचा ऐवज आहे त्या परिस्थितीत सापडला. याची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर तक्रारदाराकडे ती पिशवी देण्यात आली," अशी माहिती तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्ले यांनी दिली.