पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : पाच वर्षाची ती चिमुकली रोज खेळायला जायची तशी गुरुवारीसुद्धा गेली होती. पण ती घरी परतलीच नाही. दिवसभर शोधा शोध झालीय. शुक्रवारी सकाळी पाहिलं तर अर्धवट बांधकाम असलेल्या प्लॉटच्या सेप्टिक टॅंकमध्ये तिचा बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. हे चित्र पाहून वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. नागपूरच्या (Nagpur News) बेसा परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योती राजू शाहू असं पाच वर्षीय चिमुकलीच नाव आहे. सेप्टी टॅंकमध्ये पडल्यानंतर बोलता येत नसल्यानेच चिमुकलीला मदतही मागता आली नाही. त्यामुळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


शंका आल्याने पाहणी केली अन्...


बेसा चौकातील जिल्हा परिषद शाळेजवळ मोठं मैदान आहे. याच ठिकाणाहून काही अंतरावरील वस्तीत पाच वर्षीय ज्योती शाहू राहत होती. याच मैदानावर लहान मुलं खेळत असतं. गुरुवारी ज्योती खेळायला गेली. पण परत न आल्यानं  सर्वत्र शोध सुरू झाला. दिवसभर शोध घेऊनही ज्योती न सापडल्याने अखेर रात्री बेलतरोडी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने शोधमोहिम हाती घेतली. शुक्रवारी सकाळी ज्योतीचे वडील राजू यांनी शंका आल्याने त्या प्लॉटच्या सेप्टिक टॅंकमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र ते चित्र पाहून राजू यांना धक्का बसला.


राजू यांनी एक लाकडी दांडा सेप्टी टॅंकच्या आतमध्ये टाकून पाहिला तेव्हा त्यांना त्यात काही तरी अडकल्याचे जाणवलं. राजू यांच्या हाती एक जाळी लागली. राजू यांनी जाळी बाहेर ओढली तेव्हा त्यात चिमुकली ज्योती अडकल्याचे दिसले. हा प्रकार पाहून ज्योतीच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पोलीस घटनस्थळी पोहचत ज्योतीचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. 


बोर खाण्यासाठी गेली अन्... 


दरम्यान, अर्धवट बांधकाम असणाऱ्या प्लॉटवर एक बोरीचं झाड होतं. त्यामुळे बरेचदा मुलं हे खेळता खेळता बोर खाण्यासाठी तिथे जात असत. त्यामुळे ज्योती सुद्धा कदाचित बोर खाण्यासाठी तिथे गेली असावी आणि याच दरम्यान ती टॅंकमध्ये पडली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुर्दैवाने तिला बोलता येत नसल्यानं ज्योतीला मदतही मागता आली नाही. दुसरीकडे त्या टाकीत एक जाळी असल्यानं ज्योती त्या जाळीत अडकवून पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.