अखंडित वीज पुरवठ्याची आश्वासनं हवेत, उर्जा मंत्र्यांच्या शहरातच वारंवार वीजपुरवठा खंडित
नागरीक संतापले, वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अमर काणे, झी मीडिया नागपूर : नागपूर शहरातील अनेक भागात सलग तिसऱ्या दिवशी संध्याकाळनंतर वीज पुरवठा खंडीत झाला. गेल्या काही दिवसात अनेक भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. त्यामुळे अखंडित वीज पुरवठ्यासाठी सज्ज असल्याचा दावा करणारी महावितरण यंत्रणा ऊर्जामंत्र्यांच्याच शहरात फेल झाल्याचं चित्र या निमित्ताने दिसलं.
दुपारी भीषण उष्णता आणि उकाड्यामुळे प्रचंड त्रस्त असलेल्या नागरिकांना महावितरणच्या बेभरवशाच्या कारभारामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खासकरून मध्य नागपूर, पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपुरातील अनेक भागात वीज पुरवठा वारंवार खंडीत होतोय.
लहान मुलं, वयोवृद्धांचे हाल
सलग तिसऱ्या दिवशी बत्तीगुल प्रकरणामुळे या परिसरातील नागरिकांत प्रचंड रोष आहे. लहान मुलं आणि वयोवृद्धांचे रात्रीच्या या बत्ती गुलमुळे प्रचंड हाल होत आहेत. महावितरण कडून तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण देण्यात येत आहे सलग तीन दिवस या परिसरात वीज पुरवठा रात्रीच्या सुमारास खंडित झाला आहे
नागरिकात संताप, वीज उपकेंद्रावर धडक
शहरातील अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.त्यामुळे नारिकांसोबत पूर्व आणि दक्षिण नागपूरचा भागातल्या दोन वेगवेगळ्या वीज उपकेंद्रवर दोन माजी नगरसेवक जाऊन धडकले. रात्री माजी नगरसेवक बंटी कुकडे यांनी वाठोडा उपकेंद्रातील टेबलावर जाऊन ठाण मांडत आंदोलन केलं.
तर नगरसेवक बाल्या बोरकर यांनी हिवरीनगर उपकेंद्रावर नागरिकांसोबत जात वारंवार खंडीत वीजपुरवठा होत असल्याची तक्रार दिली. माजी नगरसेवक बंटी कुकडे यांनी याबाबत प्रचंड संताप व्यक्त करताना वीज केंद्रातील टेबलावरचा ठाण मांडून बसताना अधिकऱ्यांना धारेवर धरलं यापुढे वारंवार वीजपुरवठा खंडित झाला तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.