अमर काणे, झी २४ तास - नागपूर - बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात ली 2 वाघीण आणि राजकुमार वाघ यांच्या बछड्याचा जन्म झाल्यानंतर अवघ्या काही तासात मृत्यू झालाय. ( baby of lee tigress death ) त्यामुळे दुःखद बातमीने गोरेवाडा प्राणिसंग्रहालय,  प्रशासनात आणि वन्यप्रेमी हळहळ व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात ली वाघीण (Lee Tigress) आणि राजकुमार वाघ (Rajkumar Tiger ) यांच्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. 31 मे 2022 रोजी ली वाघिणीने दुपारी 4 वाजण्य़ाच्या सुमारास एका पिल्लाला जन्म दिला होता. मात्र हा आनंद अगदी क्षणिक होता. बछड्याला जन्म दिल्यानंतर या पिल्लाला उचलताना वाघिणीचा दात लागून पिल्लाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे लक्षात आले. 


यावेळी प्राणीसंग्रहालयाचे पशुवैद्यकांसह महाराष्ट्र मत्स्य आणि पशू विज्ञान विद्यापिठातील तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक प्राणिसंग्रहालयात उपस्थित होते. रात्री उशीरा तिच्या प्रसव पिडा थांबल्यानंतर तिच्या गर्भात आणखी पिल्ले आहेत किंवा असल्यास त्याबाबत पुढील उपचार या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.


ली आणि राजकुमार या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या जोडीला पिल्ले होण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. 11 वर्षांच्या ली वाघिणीचे वय जास्त असल्याने सदर प्रयत्नाना अपेक्षित यश मिळण्यास अडचणी होत्या. (वाघाचे नैसर्गिक आयुष्य 12 ते 14 वर्षे असते) गेले महिनाभर आधीपासून ली वाघिणीला राजकुमार वाघापासून स्वतंत्र ठेवून तिच्या गर्भारपणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.


तिच्या नैसर्गिक पद्धतीने प्रसव होण्यासाठी तिच्या रात्र निवाऱ्यात विशेष बाळंतगुफा तयार करण्यात आलेली होती. या गुफेत तापमान आणि प्रकाश नियंत्रण व्यवस्थे व्यतिरिक्त रबरी मॅट, गवताच्या गाद्या याशिवाय़ कुलरची सोय देण्यात आली होती. वाघिणीच्या नैसर्गिक वर्तुवणूकीत बदल न होता लक्ष देण्यासाठी विशेष CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते.


यापूर्वीही ली वाघिणीने चार पिल्लांना जन्म दिल्यानंतर मारले


यापूर्वी ली वाघिणीने 2016 साली साहेबराव नावाच्या वाघापासून एकदा गर्भ राहिला होता. त्यावेळी तिने चार पिल्लांना जन्म दिला होता तथापि त्यावेळेस तिला मातृत्व भावना नसल्याने काही वेळातच तिने सर्व पिल्लांना मारुन टाकले होते.


आईपासून लहाणपणीच विभक्त झालेल्या बहुतेक मांसाहारी प्राण्यांमध्ये अशी लक्षणे पहिल्या बाळंतपणात दिसून येतात. यावेळेस तिने पिल्लांना न स्विकारल्यास पिल्लांच्या संगोपनासाठी विशेष इनक्युबेटर ची व्यवस्था प्राणिसंग्रहालयामध्ये करण्यात आली होती.


मात्र ली वाघीण आणि राजकुमार वाघाच्या बछडा अगदी काही क्षणातच मृत्यू पावला यावेळी प्राणीसंग्रहालय संचालक श्री. एस. एस. भागवत, गोरेवाडा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक डॉ. व्ही. एम. धुत, पशुवैद्यकिय विद्यापिठाचे प्राणिप्रसव विभागाचे तज्ज्ञ डॉ. एम. एस. पाटील, प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक डॉ. मयुर पावशे आणि डॉ. सुजित कोलंगठ, जनरल क्युरेटर श्री. दिपक सावंत, बाय़ोलॉजिस्ट श्री. शुभम छापेकर यांचेसह प्राणीसंग्रहालयाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.