प्रशांत परदेशी, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Nagpur Crime News: रेल्वेत विनातिकिट प्रवास केल्यास दंड आकारला जातो. दंडाचे पैसे न भरल्यास तुरुंगावास घडण्याचीही भीती असते. नागपूरमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. रेल्वे तिकिट नसल्याने तुरुंगात जाण्याची भीती वाटल्याने तरुण प्रवाशांने धावत्या एक्स्प्रेसमधून उडी घेतल्याची घटना घडली आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. (Nagpur News)


रेल्वे तिकीट नसल्यानं आणि टीसीसोबत झालेल्या वादातून व तुरुंगात जाण्याची भीती वाटल्याने तरुण प्रवाशाने धावत्या एक्सप्रेस ट्रेनमधून उडी घेतल्याची घटना कामठी स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. 23 वर्षीय मोहित सोनी असं जखमी तरुणाचे नाव आहे. तरुणाचा डावा पाय आणि हाताला दुखापत झाली आहे.


रेल्वे पोलिसांनी जखमी तरुणाला उपचाराकरिता शासकीय रुग्णालय कामठी येथे दाखल केले होते. मात्र, त्यानंतर पुढील उपचारांसाठी नागपूरला मेयो रुग्णालयात भरती केले आहे. त्याच्यावर सध्या उपचार असून त्याची प्रकृती स्थिर आहे. 


तरुण हा आई वडिलांसोबत रीवा मध्यप्रदेश वरून नागपूरला येत होते. दरम्यान भंडारा स्थानकात बऱ्याच वेळेपासून पॅसेंजर उभी असल्यानं ते महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चढले. मात्र, यावेळी ते रिझर्व्हेशन कोचमध्ये चढले. त्याच कोचमध्ये टीसी आल्याने त्याने तिकिट दाखवण्यास सांगितले. आरक्षित डब्यामध्ये चढले असल्याने त्यांच्याकडे तिकिट नव्हते.


टीसीने तिकिट विचारल्यास त्यांचा टीसीसोबत वाद झाला. यावेळी टीसीने विना तिकीट असल्यानं दंड भरावा लागेल अथवा तुरुंगात जावं लागेल असं म्हटल्याने वाद वाढला. मुलगा शिक्षण घेत असल्यानं तुरुंगात जावं लागेल या भीतीने कामठी स्टेशन जवळ येताच उडी घेतली. तरुणाने उडी घेताच एक्स्प्रेस लगेचच थांबवण्यात आली. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात त्याचा पायाला जबर दुखापत झाली आहे. इतवारी रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकारामुळं महाराष्ट्र एक्स्प्रेस बराच वेळ स्थानकात थांबून राहिली होती.