चार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण आणि सुटकेचा थरार
राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये चार वर्षांच्या एका चिमुरडीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला.
नागपूर : राज्याच्या उपराजधानीत चार वर्षांच्या एका चिमुरडीच्या अपहरणामुळे बुधवारी सायंकाळी चांगलीच खळबळ उडाली होती. सुमारे सहा तासानंतर चिमुरडीची सुटका झाली.
या मुलीला कोणीतरी अनोळखी व्यक्ती घेऊन जात असल्याची माहिती तिच्या पाच वर्षांच्या भावाने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरली आणि ही मुलगी अखेर सापडली.
दरम्यान अपहरणकर्त्याची दृष्य सीसीटीव्हीत दिसत आहेत. चार वर्षांच्या निरागस, गोंडस श्रद्धाला असं खेळताना पाहून तिच्या आईवडिलांचा आनंद शब्दात न सांगता येणारा. कारण शुक्रवारी दुपारी चार ते रात्री दहापर्यंतचा कालावधी त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण राहिला.
त्यांच्या या लाडक्या चिमुरडीचं एका व्यक्तीने अपहरण केलं होते. श्रद्धा तिच्या पाच वर्षांच्या चुलतभावासोबत घराजवळ खेळत असताना एका अज्ञात व्यक्तीने कबुतर दाखवतो असं सांगत तिला पळवून नेलं.
बहिणीला एक अनोळखी व्यक्ती गाडीवर बसवून घेवून गेल्याचं चुलत भाऊ यशने घरी जाऊन सांगितलं. त्यानंतर तातडीने कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनीही लगेच शोध मोहीम सुरू करत या व्यक्तीचा माग काढायला सुरूवात केली. त्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचाही आधार घेतला.
अखेर रात्री नऊ वाजताच्या सुमारास श्रद्धा सुखरुप सापडली आणि सर्वांनीच निश्वास सोडला. श्रद्धाचं अपहरण करणाऱ्यांचं दृष्य सीसीटीव्हीत कैद झालंय. पण अपहरण नेमकं कशासाठी केलं याचा तपास अजून लागलेला नाही. अपहरणकर्ताही फरार आहे.