शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू पेट्रोल पंपावर करतोय नोकरी...
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूच्या वाट्याला उपेक्षाच....14 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करूनही प्रवीण वहालेवर का आलीय पेट्रोल पंपावर काम करण्याची वेळ...
अमर काणे, झी मीडिया नागपूर: शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूला पेट्रोल पंपावर काम करण्याची वेळ आली आहे. राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्राप्त आट्यापाट्या खेळाडू प्रवीण वहाले नागपुरात एका पेट्रोल पंपावर काम करून उदरनिर्वाह करत आहे. पेट्रोल पंपावर काम करून ते आपल्या कुटुंबाचं पोट भरत आहे.
प्रवीणने 1991 ते 2007 दरम्यान 14 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. 8 राष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्ण पदकासह अनेक पदक त्याने जिंकली. दीड दशकपेक्ष्या जास्त काळ मैदानावर घाम गाळणाऱ्या प्रवीणने आट्यापाट्या बरोबर खो-खोमध्ये उत्तम कामगिरी केली. 2006 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आट्यापाट्या खेळासाठी शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला. राज्याचे नाव राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गाजवणाऱ्या प्रवीणला आर्थिक आघाडीवर मात्र सर्वत्र नुसती पान पुसण्यात आली. या चॅम्पियन खेळाडूने राज्य शासना घोर उपेक्षा झाली .
प्रवीणने स्पोर्ट कोट्यात अनेक ठिकाणी नोकरीसाठी उंबरठे झिजवले. मात्र कुणीही त्याची दखल घेतली नाही. अखेर घराचा गाडा चालवण्यासाठी प्रवीणने कधी नळ फिटिंग तर कधी पेंटिंगची कामे करून उदरनिर्वाहाचा पर्याय निवडला. तर गेल्या काही महिन्यांपासून तो नागपुरातील एका पेट्रोल पंपावर काम करत आहे.
राज्याच्या चॅम्पियन खेळाडूची झालेली ही परवड खेळात करिअर घडवणाऱ्या तरुणांसाठी नक्की चिंतेची बाब आहे. एकेकाळी क्रीडा क्षेत्रात देशात आघाडीवर असलेलं महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात का मागे पडतं आहे याचं हे वास्तव दाखवून देत आहे.
आताच्या ऑलिम्पिकमध्ये देखील महाराष्ट्रातील खेळाडूंना मेडल मिळवण्यात विशेष यश मिळालं नाही. बरेचदा चांगली कामगिरी आणि पुरस्कार मिळूनही या खेळाडूंच्या वाट्याला उपेक्षा आल्याचं दिसत आहे. आट्यापाट्या खेळाडू प्रवीण महाले प्रमाणे राज्यातील अनेक खेळाडूंची अशीच व्यथा आहे जी अत्यंत दुर्दैवी आहे.