नागपूर : एक चोर रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरतो, तिथून पळून जातो आणि दुसरं सावज शोधण्याच्या तयारीत असतो.... पण तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि चोराला बेड्या घालतात.... हे सगळं होतं अवघ्या चार मिनिटांत. रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर रेल्वे स्टेशन...बुधवार सकाळची वेळ...संदीप सवायन नावाचा एक प्रवासी  रेल्वे तिकीट केंद्र परिसरात झोपला होता. मोबाईल चोर शेख शब्बीर तिथे पोहचला. त्याने  झोपलेल्या संदीपच्या खिशातला मोबाईल चोरला आणि तिथून निघून गेला. पण शब्बीरची ही चोरी सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली होती. त्याचवेळी आरपीएफच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात आरपीएफ जवान लक्ष ठेवून होते. ही सगळी चोरी लाईव्ह त्यांना दिसली आणि आरपीएफ जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.


सीसीटीव्ही कंट्रोलरुममधला एक कर्मचारी चोरट्यांवर लक्ष ठेवून होता. शब्बीर शेखला पकडायला गेलेल्या आरपीएफ जवानाला तो शब्बीर शेख नेमका कुठे आहे ते सांगत होता..... आणि शब्बीर शेख अगदी अलगद पोलिसांच्या जाळ्यांत सापडला. शेख शब्बीर लगेच दुसरा मोबाईल चोरीच्या तयारीत होता, पण त्याआधीच त्याला बेड्या घालण्यात आल्या. सगळे कर्मचारी योग्य काम करत होते, म्हणून हे शक्य झालं.चोरी केल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत चोर पकडला गेला.