अमर काणे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी  नागपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ठिकठिकाणी पोलिसांची गस्तही सुरू आहे. तरीही शहरात चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. शहरातली वाईन शॉप चोरट्यांच्या टार्गेटवर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील कॉटन मार्केट परिसरातील जयकांत वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी बुधवारी रात्री लोखंडी तिजोरीसह ९५ हजारांची चोरी केली. गेल्या दहा दिवसात शहरातील अनेक वाईन शॉपमध्ये चोरीच्या घडना घडल्यात. 


हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे तरीही घरफोड्यांचं आणि दरोड्यांचं सत्र सुरूच आहे. घरफोड्यांचे सत्र सुरुच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ सोमवारी पराग परांजरे यांच्या घरी घरफोडी करत चोरट्यांनी अर्धा कोटींचा मुद्देमाल लंपास केला.


तीन दिवस झाले असले तरी अजूनही या चोरीचा छडा लागलेला नाही. त्यातच आता शहरातील वर्दळीच्या कॉटन मार्केटजवळील एका वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी तिजोरीसह ९५ हजार चोरून नेले. जयकांत वाईन शॉपमध्ये  तिजोरीसह रोकड पळवून नेणा-या चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्हीतही कैद झाल्या आहेत.


ही चोरी करताना अगोदर चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयशी ठरल्यानंतर खिडकीतून घुसण्याचा प्रयत्न केला. त्यातही अपयशी ठरल्यानंतर चोरट्यांनी थेट भिंत फोडून या वाईन शॉपमधील सुमारे ३०-४० किलो वजनाची तिजोरीच उचलून नेली. दरम्यान नंदनवन पोलिसांना आज सकाळी १८ नंबर गल्लीत एक तिजोरी सापडली आहे.


गेल्या दहा दिवसात शहरात अनेक ठिकाणी वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे. नंदनवन परिसरातील सुरूची वाईन शॉप फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर सोना वाईन शॉपमध्ये सोमवारी सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला. अधिवेशनासाठी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना चोरट्यांनी घातलेला हैदोसमुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.