नागपूर : नागपूर अधिवेशनात सभागृहात जे काही घडतं, त्यापेक्षा जास्त रंगतदार सभागृहाच्या बाहेर घडतं. अशीच चर्चा होती ती नागपुरात आलेल्या तीन पाहुण्यांची. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच शरद पवार, संजय राऊत आणि एकनाथ खडसे हे तीन पाहुणे आले. नागपूर अधिवेशनात या तीन पाहुण्यांचीच जास्त चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार नागपूर अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा करायला पोहोचले. पवारांनी सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्या देवगिरी बंगल्यावर. यातलं बिटवीन द लाईन्स लक्षात घ्या. देवगिरी हा नागपुरातला उपमुख्यमंत्र्यांचा बंगला. म्हणजेच पवारांनी उपमुख्यमंत्रिपदावर हक्क सांगितलाय आणि अधिवेशनानंतर दोन दिवसांत विस्ताराला राष्ट्रवादी तयार असल्याचंही स्पष्ट केलं. पवार आणि खडसेंचीही भेट झाली. नागपुरातल्या थंडीतली ती गरमगरम तर्री.


नागपुरात दुसरे पाहुणे दाखल झाले ते खान्देशातून. विधिमंडळ हा खडसेंचा प्राण. खडसे राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा असताना खडसेंनी नागपुरात येऊन पवारांची भेट घेतली. पण मी पक्षावर नाराज नाही, असंही सांगितलं.


नागपुरातले तिसरे पाहुणे म्हणजे शिवसेनेचे ओपनिंग बॅटसमन संजय राऊत. आक्रमक विरोधक जोरदार बाऊन्सर टाकणार याचा अंदाज घेऊनच राऊत नागपुरात दाखल झाले. राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये जामिया आणि जालियानवालाची एडिट लाईन ठरली असावी. कारण राऊतांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी बाहेर येऊन सणसणीत बाईट दिला.


महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेदरम्यान नेहमी व्हायची ती पवार आणि राऊत भेट नागपुरातही झाली आणि तिथे कार्यक्रम ठरलाय तो पवारांच्या मुलाखतीचा. २९ डिसेंबरला पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात संजय राऊत शरद पवारांची मुलाखत घेणार आहेत. सभागृहाचं कामकाज आणि गदारोळ सुरूच आहे, पण जास्त बातम्या दिल्या या बाहेरुन आलेल्या आणि आमदार नसलेल्या या तीन पाहुण्यांनीच.