आदित्यचं झालं सरोवर, दानवेंचं झालं फुलपाखरु, राजकीय नेत्यांना खूष करण्यासाठी काय पण
राजकीय नेत्यांना खुष करण्यासाठी चक्क विविध विकासकामांना राजकीय नेत्यांची नावं
विशाल करोळे, झी मीडिया औरंगाबाद : औरंगाबादमध्ये खाम नदी उद्यानाचं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पण उदघाटन केलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. राजकीय नेत्यांना खुष करण्यासाठी चक्क विविध विकासकामांना राजकीय नेत्यांची नावं देण्यात आली होती.
या ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या नावानं सरोवर होतं. तर अंबादास दानवेंच्या नावानं फुलपाखरू उद्यान. शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंच्या नावानं योग गार्डन तर एमआयएमला राग येऊ नये म्हणून इमतियाज जलीलांच्या नावानं सूर्यकुंड तयार होतं.
भाजप आमदार अतुल सावेंच्या नावानं बालोद्यान तर डॉ. भागवत कराडांच्या नावानं तलाव निर्माण झाला. राजकीय नेत्यांच्या खूषमस्करीचा भाजपने मात्र समाचार घेतला. तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही नावांच्या पाट्यांवरुन टोले लगावले.
महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची ही आयडिया होती. त्यामुळे औरंगाबादमध्ये कमाल करते हो पांडेजी. याची खुमासदार चर्चा रंगली आहे. शहराच्या निर्मितीत योगदान देणाऱ्यांची किंवा प्रेरणा देणाऱ्यांची नावं विविध प्रकल्पांना दिली जातात. पण राजकीय नेत्यांची एवढी खूषमस्करी कशासाठी, असा प्रश्न औरंगाबादकर विचारतायत.