माझ्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न - नाना पटोले
काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा खळबळजनक विधान केले आहे.
मुंबई : काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत (Maha Aghadi government) अंतर्गत वाद असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून माझ्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे विधान नाना पटोले यांनी केले आहे.
नाना पटोले यांनी महाराष्ट्र अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक विधाने करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे नाना पटोले यांच्या या नव्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे. स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार, असाही आरोप यावेळी त्यांनी केला आहे.
लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद उद्धव ठाकरे, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे (दिलीप वळसे-पाटील) आहे, असे सांगताना नाना पटोले यांनी मला सुखाने जगू देणार नाहीत, असेही म्हटले आहे. दुष्मनाला मारायचे असेल तर घरात घुसून मारावा लागतो. आपण ही पावले उचलल्यास दुष्मन पहिले आपले घर वाचवेल, तुमच्या घरावर लक्ष ठेवणार नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहायला लागली आहे. हे त्यांना माहिती आहे. राजकीय परिस्थिती, कुठं आंदोलन यांचा रिपोर्ट द्यावा लागत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, हे त्यांना कळत नाही. कुठं ना कुठं ते आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार. आणू दया, कर नाही त्याला डर कशाला, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली.
दरम्यान, नाना पटोले यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला. ते लहान माणसं आहेत. त्याच्यावर मी कशाला बोलू, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी प्रतिक्रिया दिली असती, असे पवार म्हणाले होते.