`नाणार`वरून मुख्यमंत्री कात्रीत...
नाणार प्रकल्पावरून विरोधाचा राजकीय धुरळा उडत असताना, मुख्यमंत्र्यांनी मात्र नाणार होणारच, अशी ठाम भूमिका घेतलीय. त्यावरून शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांवर जोरदार आगपाखड केलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यात उडी घेतलीय.. नाणारचं आता काय होणार? याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
मुंबई : नाणार प्रकल्पावरून विरोधाचा राजकीय धुरळा उडत असताना, मुख्यमंत्र्यांनी मात्र नाणार होणारच, अशी ठाम भूमिका घेतलीय. त्यावरून शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांवर जोरदार आगपाखड केलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यात उडी घेतलीय.. नाणारचं आता काय होणार? याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
शिवसेनेची तिखट प्रतिक्रिया
कोकणातील नाणारवासियांनाच नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेलाही अंधारात ठेवून केंद्रातील मोदी सरकारनं नाणार प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार करून दाखवला. सौदी अरेबियातल्या अरामको कंपनीशी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं करार केल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि शिवसेनेनंही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही अखेर पिचक्या पाठकण्याचेच निघाले... 'नाणार' प्रकल्प लादणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतानाही हा प्रकल्प लादला गेला. मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत नाही. मात्र शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली.
शरद पवार देणार नाणारला भेट
नाणारवासियांनीदेखील मुंबईत सभा घेऊन हिंसक आंदोलन करण्याचा इशारा दिला. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची भूमिका नारायण राणेंनी स्पष्ट केली... तर काही स्थानिक नागरिकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच गाऱ्हाणं घातलं. त्यानुसार येत्या 10 मे रोजी पवार स्वतः नाणारला भेट देणार असून, स्थानिक जनतेची बाजू समजून घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा खुलासा
दरम्यान, सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी झालेला सामंजस्य करार वेस्ट कोस्ट रिफायनरींबाबत आहे. नाणार प्रकल्पाशी त्याचा संबंध नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलाय. स्थानिकांना विश्वासात घेऊनच नाणार प्रकल्पाबाबत पुढचा निर्णय घेण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली...
नाणार प्रकल्प होणारच, यावर मुख्यमंत्री ठाम आहेत. आता स्थानिक जनतेचा विरोध ते कसा कमी करणार? आणि शिवसेनेसारख्या राजकीय मित्रपक्षांची कशी समजूत काढणार? याकडं आता नाणारसह राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलंय.