कधी थांबणार हे प्रकार! छेडछाडीला कंटाळून बारावीतल्या मुलीची आत्महत्या, नांदेडची घटना
ती कॉलेजला जायचा तो दररोज तिला छेडायचा याबाबत तीने अनेकवेळा तक्रार केली, पालकांनाही सांगितलं. आरोपीच्या घरीही तक्रार केली. पण त्याच्याकडून त्रास देण्याचा प्रकार काही केल्या थांबत नव्हता. शेवटी त्या मुलीनेच टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
सतीश मोहिते, झी मीडिय, नांदेड : कितीही कठोर कायदे केली तरी मुलींवरच्या अन्यायाच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. नांदेडमध्ये (Nanded) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडीला (Teasing) कंटाळून इयत्ता 12 वी मध्ये शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यात घडलीये. मुदखेड तालुक्यातील निवघा इथं राहाणाऱ्या सपना पेदे या मुलीने छेडछाडीला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. सपना ही दररोज सायकलवरुन बारड इथल्या महाविद्यालयात जात होती. सपना महाविद्यालयात जात असताना तिच्याच गावातील 22 वर्षीय ज्ञानेश्वर पवार तिची छेड काढत होता.
वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. याबाबत आरोपीच्या घरी आणि पोलीस पाटलाना सपनाच्या आई वडिलांनी माहिती दिली होती. तरीही छेडछाडीचा प्रकार सुरुच होता. या सर्वाला सपना कंटाळली होती. अखेर सपनाने डोंगरगाव शिवारात एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर पवार विरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बारड पोलीस आरोपीचा शोध घेताहेत. छेडछाडीला कंटाळून मुलीला आत्महत्या करण्याची वेळ आल्याने मुदखेड तालकुक्यात खळबळ उडालीये मृत सपनाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ
राज्यात मुलींची छेडछाड, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर तर पुणे आणि नागपूर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत एप्रिल 2023 पर्यंत तब्बल 713 गुन्हे दाखल आहेत, महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. छेडछाडी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, तक्रारदार महिला-तरुणींना बदनामीची भीती यामुळे या आरोपींना धाक राहिला नसल्याचं यावरुन स्पष्ट होतं.
डोंबिवलीत वृद्धाची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून एका वृद्ध महिलेने लोकल खाली उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयाद्रावक घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली रेल्वे स्थानकावर आज सकाळच्या सुमारास घडली. प्रभा नांबूदिरी असं मृत महिलेचं नाव आहे. डोंबिवली पश्चिमेकडील कर्वे रोड परिसरात ही महिला राहत होती. गेल्या अनेक वर्षापासून प्रभा नांबूदिरी यांना अत्सामा आजाराने त्रस्त होत्या. आजारापणाला कंटाळून आपण आत्महत्या केल्याची सुसाईड नोट तिच्याजवळ आढळून आल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली. आहे.