Nanded Crime : बायको घरी नाहीये, मी टेन्शनमध्ये आहे... पोलीस कर्मचाऱ्याच्या कृत्याने एकच खळबळ
Crime News : नांदेडच्या (Nanded) शिवाजीनगर परिसरात हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय. नांदेड पोलिसांनी (Nanded Police) या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे
सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : वीजबिल (Electricity bill) वसुलीसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंत्यास पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये (Nanded Crime News) घडलाय. पोलीस कर्मचाऱ्याने अभियंत्याच्या नाकाचा चावाही घेतला. या मारहाणीत वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्याचे दोन दातही पडले. दरम्यान, अभियंत्याच्या दुसऱ्या एका साथीदाराने मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अभियंत्याने दिलेल्या तक्रारीवरुन हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात आता पोलिसांत (Nanded Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
नांदेडमधील वीज वितरणचे सहाय्यक अभियंते श्रीकांत सोनटक्के हे आपल्या सहकाऱ्यासह वीजबिल वसुलीसाठी स्नेह नगर पोलीस वसाहतीत गेले होते. यावेळी सोनटक्के यांनी निवृत्ती केंद्रे या पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्याच्या मिटरमधून अनधिकृतपणे वीज कनेक्शन घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर सोनटक्के यांनी याबाबत चौकशी करण्यासाठी निवृत्ती केंद्रेची भेट घेण्याचे ठरवले. निवृत्ती केंद्रेकडे पोहोचताच सोनटक्के यांनी याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. मात्र केंद्रे याने सोनटक्के यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. यामध्ये सोनटक्के यांचे दोन दात पडले.
निवृत्ती केंद्रे याने सोनटक्के यांच्या नाकावरही चावा घेतला. त्यानंतर सोनटक्के यांच्यासोबत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने मध्यस्थी करून कसेबसे सोनटक्के यांची सुटका केली. दरम्यान, या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी निवृत्ती केंद्रे वर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे पोलीस कर्मचारी निवृत्ती केंद्रे याच्या घरात कौटुंबिक वाद सुरू असून त्यांची पत्नी सोडून गेल्याने तो मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस तक्रारीत काय म्हटलंय?
"शनिवारी सकाळी ऑफिसला असताना मला सुर्यवंशी नावाच्या महिलेचा मला फोन आला होता. यावेळी महिलेने आपण स्नेहनगर येथे राहत असून माझ्या लाईट मीटरमधून दुसरे लोक लाईट वापरत आहे अशी माहिती दिली. त्यानंतर मी आणि कंत्राटी कर्मचारी शेख अतिक असे आम्ही दोघेजण त्याठिकाणी जाऊन पाहिले. त्यावेळी मीटरच्या बाजूला असलेल्या बसबारमध्यू वरच्या दोन कॉर्टरला लाईट गेल्याचे दिसले. तेव्ही मी तो विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यावेळी कोणत्या घरात लाईट गेली हे पाहण्यासाठी वर जाऊन पाहिले तेव्हा 7 आणि 8 क्रमांकाच्या खोलीमध्ये लाईट बंद झाल्या. त्यावेळी मी दरवाजा वाजवला तेव्हा पोलीस कर्मचारी निवृत्ती केंद्रेने दरवाजा उघडला. मी त्यांना तुमचा विजेचा पुरवठा अनधिकृत असल्याने खंडीत केल्याचे सांगितले. त्यावर केंद्रेने माझी पत्नी माझ्यासोबत नाही, मी तणावामध्ये आहे. तुम्ही आमची लाईट का बंद केली? तुम्ही नेहमीच असा त्रास देता, असे म्हणून माझी कॉलर धरुन घरात ओढले. निवृत्ती केंद्र याने सरकारी काम करत असताना अडथळा निर्माण केला आणि माझ्यासोबत झटापट करुन शिवीगाळ केली. त्यानंतर माझ्या तोंडावर बुक्कीने मारुन माझे खालचे दोन दात पाडले," असे सहाय्यक अभियंते श्रीकांत सोनटक्के यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.