शाळेचा पहिला दिवस पण वर्गात शिक्षकच नाहीत, पुढे विद्यार्थ्यांनीच केलं असं काही...
आजपासून राज्यातील शाळा सुरु झाल्या. शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरु झाल्याने पालकांचीदेखील धावपळ सुरु झाली. दरम्यान नांदेडच्या शाळेतून एक प्रकार समोर आला. विद्यार्थी शाळेत गेले पण काही वर्गांमध्ये शिक्षकच नव्हते. शाळेत अपुरा शिक्षकवर्ग असल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठा निर्णय घेतला.
सतीश मोहिते,झी २४ तास, नांदेड: आजपासून राज्यातील शाळा सुरु झाल्या. शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरु झाल्याने पालकांचीदेखील धावपळ सुरु झाली. दरम्यान नांदेडच्या शाळेतून एक प्रकार समोर आला. विद्यार्थी शाळेत गेले पण काही वर्गांमध्ये शिक्षकच नव्हते. शाळेत अपुरा शिक्षकवर्ग असल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठा निर्णय घेतला.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शाळा भरविली. शिक्षक देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी सकाळपासून ताटकळत उभे होते.
शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक देण्याच्या मागणी लावून धरली. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या मरखेल येथील जिल्हा परिषद शाळेतून हा प्रकार समोर आला. मरखेल येथील शाळेत तब्बल 560 विद्यार्थीसंख्या आहे. मात्र केवळ 8 शिक्षक येथे कार्यरत आहेत. गणित, विज्ञान सारख्या महत्त्वाच्या विषयांचे शिक्षक नाहीत.
या शाळेत किमान 22 ते 25 शिक्षकांची गरज आहे. शिक्षक देण्याच्या मागणीसाठी शालेय शिक्षण समितीने वर्षभरापासून पाठपुरावा केला मात्र शिक्षण विभागाने एकही शिक्षक दिला नाही. प्रशासन लक्ष देत नाही म्हटल्यावर विद्यार्थ्यांनाच या बाबीत हस्तक्षेप करावा लागला.
त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी थेट सव्वाशे किलोमीटर अंतर कापून जिल्हा परिषद गाठली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत विद्यार्थ्यांनी शाळा भरवली.