सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : प्रवाशी रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये (Nanded News) घडली आहे. समोरासमोर झालेल्या या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हृदयद्रावक बाब म्हणजे यामध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे. जखमींना उपचारांसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नांदेड पोलिसांनी (Nanded Police) दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुदखेड नांदेड रोडवरील मुगटजवळ ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत रिक्षामधील काही प्रवाशी बाहेर फेकले गेले. त्यापैकी एक जण ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी हे रिक्षामध्येच अडकून पडले होते. या गंभीर घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये एका लहान बाळाचा देखील समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. अपघातानंतर लहान मुले आणि महिला गंभीर अवस्थेत रस्त्यावर विव्हळत पडल्या होत्या. गंभीर जखमींना उपचारासाठी नांदेड च्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


मुदखेड नांदेड रोडवर इजळी पाटीजवळ प्रवाशी रिक्षा आणि सिमेंटने भरलेल्या ट्रकची जोरदार धडक झाली होती. अपघात एवढा भीषण होता की रिक्षातील एक जण बाहेर फेकल्यानंतर थेट ट्रकच्या जाकाखालीच आला. यामध्ये चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला.  तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारानंतर मृत्यू झाला. रिक्षात तब्बल 15 प्रवाशी होते. हे सर्वजण वाजेगाव येथे मजुरीसाठी जात होते. अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.


पोलिसांनी काय सांगितले?


"सिमेंटने भरलेल्या ट्रकचा आणि रिक्षाचा अपघात झाला आहे. रिक्षामधून मजूर मजुरीसाठी नांदेड येथे चालले होते तेव्हा हा अपघात झाला. यामध्ये दोन महिला, एका पुरुषाचा आणि एका लहान मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बाकी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला आहे," अशी माहिती मुदखेडचे पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांनी दिली आहे.