सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडच्या (Nanded) शासकीय रुग्णालयात (Shankarao Chavan Government Hospital) मृत्यूचे तांडव सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. नांदडेमध्ये 24 तासांत 24 मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. देशभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. अपुऱ्या औषध पुरवठ्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. दुसरीकडे शासकीय रुग्णालायतील मृत्यू तांडव थांबवण्याचे नाव घेत नाहीये. याच रुग्णालयामध्ये आता बाळासह आईचाही मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका मातेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. पण शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर महिलेची प्रकृती बिघडत गेली. त्यानंतर बुधवारी महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. शनिवारपासून महिलेवर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी कुटुंबियांना उपाचाराबाबत काही माहिती दिली नाही. सर्व औषधे आणि रक्त तपासण्या बाहेरून कराव्या लागल्या. त्यासाठी 40 ते 45 हजारांचा खर्च करावा लागल्याची माहिती मृत महिलेच्या पतीने दिली. मात्र बाळापाठोपाठ आईचाही मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला आहे.


डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालं


"शनिवारी संध्याकाळी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दीडच्या दरम्यान पत्नीची नॉर्मल प्रसुती झाली. पत्नीला मुलगी झाली होती. आम्ही बाळ आणि आई कशी आहे विचारल्यावर त्यांनी चांगली आहे असे सांगितले. त्यानंतर बाळ दुसऱ्या वॉर्डमध्ये नेण्यात आले. त्यानंतर आम्ही बाळाची चौकशी करायचो तेव्हा ते चांगली  प्रकृती चांगली आहे असे सांगायचे. त्यानंतर सोमवारी सांगितले की तुमचं बाळ गेलं आहे त्याला घेऊन जा. याच रुग्णालयात पत्नीवर उपचार सुरु होते. त्यादरम्यानही औषधे बाहेरुनच आणायला सांगितली जात होती. जी औषधे सांगितली ती आणली. तरीही पत्नीचे निधन झाले. नॉर्मल प्रसुती होऊनसुद्धा त्यांनी उपचार केले नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालं," असे मृत महिलेचा पती मंचक वाघमारे यांनी सांगितले.