शिक्षकदिनीच महाराष्ट्र हादरला; सातवीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकानेच केले अत्याचार, 3 दिवस घरी बोलवून...
Nanded Crime News: इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या अपल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून नराधम शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सतीश मोहिते, झी मीडिया
Nanded Crime News: आज देशभरात शिक्षक दिन (Teachers Day) साजरा केला जात आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्रात शिक्षकीपेक्षाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) नराधम आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. (Nanded Crime News Today)
इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये उघड झाली आहे. किनवट येथील एका जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे. या घटनेमुळं पालकांच्या मनातही धास्ती भरली आहे. जितेंद्र धोंडे असं आरोपीचे नाव आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील मूळ रहिवासी असलेला आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे हा किनवट मधील माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. आरोपी शिक्षकाने मुलीला आमिष दाखवून तब्बल तीन दिवस म्हणजेच 22, 23 व 24 ऑगस्ट रोजी आपल्या गोकुंदा येथील घरी नेले. त्यानंतर नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत घरी न सांगण्याबाबत धमकी दिली. या सगळ्या प्रकाराने अल्पवयीन मुलगी धास्तावली होती.
या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी घाबरली होती. मुलीने शाळेत जाण्यासही नकार दिला. तेव्हा मुलीच्या आईला थोडी शंका आल्यानंतर तिने अधीक विचारपूस करण्यास सुरूवात केली. आईने प्रेमाने समजवल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली.
अल्पवयीन मुलीसोबत घडलेला धकादायक प्रकार उघड झाल्यानंतर तिच्या पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे याच्याविरुद्ध कलम 376 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षक दिनाच्या दिवशीच ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.