सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : कधी आपल्याला गोड खायची इच्छा झाली तर चटकन आपल्या डोक्यात चॉकलेटचा विचार येतो. काहींना तर अक्षरक्षः चॉकलेट खाण्याचं वेड इतकं असतं की यामुळे अनेक आजारांना ते निमंत्रण देऊन बसतात. काही प्रसंगांमुळे तुम्हाला हे चॉकलेट खाणं किळसवाणं वाटू शकतं. असाच काहीसा प्रकार घडलाय नांदेडमध्ये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडमधील एका मॉलमध्ये नेस्ले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटमध्ये (kitkat chocolate bar) अळ्या आढळून आल्या. सुभाष भंडारे नावाच्या व्यक्तीने लातूर फाटा इथल्या डी मार्ट मधून किराणा सामानाची खरेदी केली. त्यासोबतच त्यांनी मुलांसाठी काही चॉकलेट घेतले होते. मात्र चॉकलेट खाताना त्यांना त्यात अळ्या आढळून आल्याने त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. अन्न आणि औषध प्रशासनाने चॉकलेटचा साठा जप्त करत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलाय. या प्रकारामुळे मुलांना चॉकलेट देण्यापूर्वी ते तपासून घेणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


"गुरुवारी आमच्याकडे एक तक्रार प्रात्प झाली होती. तक्रारदाराने नांदेड येथील सुपर मार्टमधून काही चॉकलेट विकत घेतले होते. त्यामध्ये त्यांना आळ्या आढळून आल्या. या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी सुपर मार्ट येथे भेट दिली. तपासणी करुन तक्रारदाराने ज्या बॅचचे चॉकलेट खरेदी केले होते त्याचे अन्य नमुने ताब्यात घेतले. हे नमुने प्रयोग शाळेत पाठवल्यानंतर त्याच्या अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल," अशी माहिती नांदेडच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक संजय चट्टे यांनी दिली.


"किराणा माल भरण्यासाठी मी मॉलमध्ये आलो होतो. किराणा मालासोबत नेस्ले कंपनीचे किटकॅट चॉकलेट खरेदी केले. त्यानंतर बाहेर येऊन खाताना त्यामध्ये अळ्या असल्याचे आढळून आले. मॉल प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर मला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडे याबाबत तक्रार दिली. त्यांनी नेस्लेच्या किटकॅटची सर्व बॅचचे नमुने जप्त केले आहेत. त्यामुळे याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सर्व उत्पादने बाजारातून परत बोलवायला हवीत," असे तक्रारदार ग्राहकाने म्हटले.