प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : चोरी, दरोड्याच्या घटना कुठे ना कुठे घडतच असतात. पण महाराष्ट्रातलं एक गाव असं आहे त्या गावातील चोरीचा रेकॉर्ड ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. याला कारणही तसंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदुरबार जिल्ह्यात एका चोरीची घटना सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गावात दोन दुकानांमध्ये चोरी झाली. दुकानांचे शटर वाकवुन चोरांनी दुकानातील पैसे आणि सामान लंपास केलं. आता तुम्ही म्हणाल की यात नवीन ते काय.  पण या चोरीमागेही एक वैशिष्ट्य आहे.


कोपर्ली गावात तब्बल 43 वर्षांनंतर चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल झाला आहे. याआधी कोपर्ली गावात 1979 साली चोरीची घटना घडली होती. गावातील एका घरावर दरोडा पडला होता. पण त्यानंतर 43 वर्ष या गावात चोरीची एकही घटना नोंदवली गेली नाही.


आता 43 वर्षांनंतर गावातल्या दोन दुकानांमध्ये चोरीची घटना घडली आहे. गावातल्या बाजार चौककातील साई दर्शन ज्वेलर्स आणि बालाजी मेडीकल या दोन दुकांमध्ये ही चोरी झाली. या घटनेत हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असला तरी चर्चा होती ती चार दशकानंतर झालेल्या चोरीची.